परफ्यूम गोदामाला भीषण आग, ८ तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू (फोटो सौजन्य-X)
bhiwandi perfume factory fire News Marathi: मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील येवई गावाच्या हद्दीत आर.के. लॉजिस्टिक गोदाम संकुलात आज (१९ फेब्रुवारी) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीत तीन कंपन्यांची गोदामे जळून खाक झाली.
बॅकारोझ परफ्यूम्स आणि ब्युटी प्रॉडक्ट्स, इंटरक्राफ्ट ट्रेडिंग आणि फ्रॅग्रन्स शॉप्स या कंपन्यांच्या गोदामांचे या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही आग तब्बल 8 तासांसापासून विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.
भिवंडीतील दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु, आगीचे धुराचे लोट तब्बल दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून दिसत आहेत. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही दहा ते बारा तासांचा वेळ लागू शकतो.
याआधी पण भिवंडी शहरातील एका पॉवरलूम कारखान्याला आग लागल्याने खळबळ उडाली. यामुळे तिथे ठेवलेली उपकरणे आणि सामान जळून खाक झाले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, रविवारी संध्याकाळी ६ वाजता फातिमा नगर परिसरातील भुसावळ कंपाऊंडमध्ये आग लागली, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यांनी सांगितले की, स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आपत्ती नियंत्रण पथकाच्या सदस्यांनी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोन अग्निशमन वाहनांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण तपासले जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.