
Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राज पुरोहित यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचे निधन
मुख्यमंत्री फडणवीसांनी शेअर केली पोस्ट
मुंबई: मुंबईतील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचे दु: खद निधन झाले आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे गेल्या काही कालावाधीपासून रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर वयाच्या 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज पुरोहित यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज पुरोहित हे भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. भाजप पक्ष मुंबईत मोठा करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. 1995 च्या युती सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद देखील सांभाळले होते. तसेच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद देखील काही काळ सांभाळले होते. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून ते 4 वेळेस विधानसभेवर निवडून गेले होते.
महाराष्ट्राच्या विधानसभेत राज पुरोहित यांची ओळख व्यक्तशीर आणि अभ्यासपूर्ण नेता म्हणून होती. 1990 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये ते कुलाबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.
मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट काय?
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमच्या सर्वांचेच जवळचे मित्र राज पुरोहितजी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने भाजपा आणि एकूणच मित्र परिवाराने एक दिलदार व्यक्तिमत्व गमावले आहे. आमदार, प्रतोद आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध भूमिकांमध्ये पक्षाच्या विस्तारात मोठे योगदान दिले. संघटनात्मक प्रक्रियेत एक भक्कम आधार म्हणून ते सदैव उभे असायचे. दृढता आणि आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव होता. सदैव उत्साही, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि सकारात्मकता त्यांच्या ठायी असायची.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमच्या सर्वांचेच जवळचे मित्र राज पुरोहितजी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने भाजपा आणि एकूणच मित्र परिवाराने एक दिलदार व्यक्तिमत्व गमावले आहे. आमदार, प्रतोद आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध भूमिकांमध्ये पक्षाच्या… pic.twitter.com/MCUvBLoPFg — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 18, 2026
व्यापारी वर्गात सुद्धा ते लोकप्रिय होते आणि त्यांचे नेतृत्व करीत अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली, ते प्रश्न सोडवून घेतले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सुद्धा प्रचारात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांचे निधन भाजपा परिवारात मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति