
स्वीकृत नगरसेवकपदावर ‘आर्थिक सौदा’चा संशय? पनवेलमध्ये शिवसेना उबाठा गटात खळबळ (फोटो सौजन्य-Gemini)
पनवेल ग्रामीण : पनवेल महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून नितीन गावंड यांच्या नावाची स्वीकृत नगरसेवक म्हणून शिफारस करण्यात आल्यानंतर स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी उघड भूमिका घेतली असून,पक्षवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या “स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. नियुक्ती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता असावी अशी ठोस भूमिका घरत यांनी घेतली आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की, “पक्षाची ताकद निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहे. कठीण काळात पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित केल्यास असंतोष वाढणे स्वाभाविक आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे पनवेलमधील उबाठा गटात सुरू असलेला अंतर्गत वाद अधिक तीव्र झाला आहे. दरम्यान, पनवेल पालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी महायुतीतील घटक पक्षांकडूनही हालचाली सुरू आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना कडून परेश ठाकूर, गणेश कडू, दिनेश खानावकर, डॉ. अरुणकुमार भगत आणि प्रथमेश सोमन यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. तर शेतकरी कामगार पक्ष–भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडीकडून प्रकाश म्हात्रे आणि उबाठा गटाकडून नितीन गावंड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
स्वीकृत नगरसेवक म्हणून शिफारस झालेल्या नितीन गावंड यांच्या नावावरूनच कार्यकर्त्यांत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना डावलून पक्षाशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तीला संधी देणे ही पक्षवाढीसाठी घातक बाब आहे,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
२०१७ मध्ये पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा एकही सदस्य निवडून आला नव्हता. मात्र यावेळी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवलेल्या उबाठा गटाचे ‘मशाल’ चिन्हावर पाच, तर मित्रपक्षाच्या चिन्हावर दोन सदस्य निवडून आले आहेत. महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या दोन स्वीकृत सदस्यपदांपैकी प्रत्येकी एक सदस्य उबाठा गट व शेकापला देण्यात आला आहे. सध्या या नियुक्तीवरून पक्षांतर्गत बैठकांचे सत्र रंगण्याची शक्यता असून, पनवेलमधील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. स्वीकृत नगरसेवकपदाचा वाद संघटनात्मक पातळीवर मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पक्षाशी संबंधित व्यक्तीच्या नावाची शिफारस स्वीकृत नगरसेवक म्हणून होणे अपेक्षित होते. मात्र असे न होता पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देणे पक्ष वाढी साठी घातक आहे, अशी माहिती शिव सेना उबाठा गटाचे अध्यक्ष शिरीष घरत यांनी दिली.