मुंबईच्या हाजीअली दर्ग्यावर हल्ल्याचे सावट (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
मुंबईतील हाजी अली दर्गा बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा फोन आल्याचं समोर आलं आहे. ही धमकी देणाऱ्या विरोधात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तारदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जो कोणी जवळ येईल त्याला गोळ्या घालू अशी धमकीही आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी सार्वजनिक आगळीक निर्माण करणे, उपद्रव निर्माण करणे आणि धार्मिक भावना दुखावणे यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने स्वत:ची “पवन” अशी ओळख करून देवस्थानच्या कार्यालयात फोन केला. हा कॉल दिल्लीतून आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, गुन्हे शाखा तारदेव पोलिसांसोबत समांतर तपास करत आहे.
हाजी अली दर्गाचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर शेख (42) यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 351(2), 352, 353(2), आणि 353(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मंगळवार आणि बुधवारी दोन वेगवेगळे मोबाईल वापरून दोन धमकीचे फोन केले. पहिला कॉल 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराच्या मोबाईलवर आला होता, जो संकेतस्थळावरून प्राप्त झाल्याचा संशय आहे. हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करणाऱ्याने स्वतःला “दिल्लीचा पवन” म्हणून ओळख सांगत आहे. आणि तो परिसर त्वरित रिकामा करण्याचे आदेश दिले.
आरोपींनी पुढे दर्गा रिकामा न केल्यास तो उडवून देण्याची धमकी दिली आणि जो कोणी जवळ येईल त्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा इशारा दिला. त्यानंतर लगेचच दुसरा धमकीचा कॉल आला. खबरदारीचा उपाय म्हणून हाजी अली परिसराची तपासणी करण्यात आली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तसेच या पवनने शिवीगाळ केल्याचं म्हटलं जात आहे.