
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार
मेट्रो ‘ॲक्वालाईन’ ही विशेष सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून सुरू होईल. तसेच १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. म्हणजेच, मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. याचदरम्यान, मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा.
मुंबई मेट्रो लाईन ३ च्या उर्वरित विभागांमध्ये सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड अशी स्थानके समाविष्ट आहेत. हा टप्पा दक्षिण मुंबईच्या प्रमुख भागांना जोडतो. त्यामुळे, अॅक्वा लाईनमुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. याचा मुंबईच्या वाहतुकीवरही लक्षणीय परिणाम होईल. मेट्रो वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.
मेट्रो-३ मार्गाचे बांधकाम गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. २०१७ मध्ये बांधकाम सुरू झाले. तथापि, तांत्रिक आणि पर्यावरणीय गुंतागुंतींसह प्रशासकीय आव्हानांमुळे ते पूर्ण होण्यास विलंब झाला. महत्त्वाचे म्हणजे, सीएसएमटी स्थानकासारख्या कोणत्याही वारसा स्थळांना नुकसान न होता संवेदनशील बांधकाम तंत्रांचा वापर करून ही मार्गिका बांधण्यात आली. या प्रकल्पावर ₹३७,२७६ कोटी खर्च झाले आहेत.