सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याकरिता नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला असून दि. 17 नोव्हेंबर 2023 पासून या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. मेट्रोची सेवा पंतप्रधान मोदी यांच्या शुभहस्ते 12 जानेवारी 2024 रोजी देशाला समर्पित करण्यात आली. या मेट्रो सेवेमुळे सीबीडी बेलापूर, खारघर आणि तळोजा परिसराला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे.
मेट्रोसेवा अधिक कार्यक्षम करण्याकरिता सिडकोतर्फे वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करण्यात येऊन सध्या गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी बेलापूर व तळोजा स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांना मेट्रोच्या फेऱ्या उपलब्ध आहेत. तर उर्वरित वेळांमध्ये दर पंधरा मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध आहे. मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात येऊन सध्या तिकीटाचा किमान दर रु. 10 व कमाल रु. 30 इतका आहे. या प्रवासीस्नेही सुधारणांमुळे सदर मार्गावरील मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यामुळे अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये मेट्रोच्या प्रवासी संख्येचा एक कोटीहून अधिक टप्पा गाठणे शक्य झाले आहे.
मेट्रो मार्ग क्र. 1 चा विस्तार बेलापूरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत करण्यात येणार आहे. तसेच 16 कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग क्र. 2 पेंधर ते तळोजा एमआयडीसी दरम्यान नियोजित असून कळंबोली आणि कामोठे मार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत या मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.






