पंतप्रधान मोदींच्या माफीनंतर विरोधक आक्रमक; जयंत पाटील म्हणाले, ''प्रायश्चित अटळ, महाराष्ट्र ...''
मुंबई: राज्यामध्ये सध्या राजकोट प्रकरणावरुन वातावरण गरम आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र नौदलाकडून उभारण्यात आलेला हा पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी तीव्र रोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नाही असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनेप्रकरणी माफी मागितली आहे. मात्र महाविकास आघाडी मागे हटायला तयार नसल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. कारण शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ”भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे. जय शिवराय.”
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
मोदींच्या हस्ते त्यांचा ड्रीम प्रोजक्ट मानल्या जाणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाबद्दल भरसभेमध्ये माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे. मोदी म्हणाले की, सिंधूदुर्गामध्ये जे झालं ते वाईट झालं. माझ्यासाठी आणि माझ्या साथीदारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. सिंधूदुर्गातील प्रकरणामुळे मी आज नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची चरणावर डोके ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही अशी लोकं नाहीत जी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अर्वाच्च भाषेत बोलणारे आम्ही नाहीत. याच भूमीचे सुपुत्र असलेल्या वीर सावरकर यांचा काही जण अपमान करतात. मात्र तो केल्यानंतर माफी मागण्यसाठी सुद्धा तयार नाहीत. न्यायालयामध्ये जाऊन लढाई लढण्यासाठी तयार आहेत. एवढ्या महान देशभक्तांचा अपमान करुनही ज्यांना पश्चत्ताप होत नाही. त्यांचे संस्कार महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहेत. मी आज या पुण्यभूमीमध्ये आल्यानंतर पहिलं काम आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची माफी मागण्याचं करतो आहे.
भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती.
आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो.
त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही.
प्रायश्चित अटळ आहे.
जय शिवराय 🚩
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 30, 2024
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. आजचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे आपण प्रथम क्रमांकांवर आहोत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आता त्यापेक्षा तिप्पट मोठे असे वाढवण बंदर तयार होत आहे. या वाढवण बंदमुळे महाराष्ट्र पुढील ५० वर्षे प्रथम क्रमांकांवर राहील. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.