मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी सर्वात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 समर्थ आमदारांसह शिवसेना सोडली. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या या सत्तांतरानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.हे संपूूर्ण महाराष्ट्राने पाहिले. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना फुटीची कथा रंगमंचावर येणार आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या या राजकीय घडामोडींवर आधारित हे नाटक असून ‘मला काहीतरी सांगायचंय’ असं या नाटकाचे नाव आहे.
प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी हे नाटक लिहीले असून शिवसेना फुटीबद्दल आणि त्या दरम्यान पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी या नाटकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. ‘मला काहीतरी सांगायचंय’ हे एकपात्री नाटक असेल. एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित या नाटकात अभिनेता संग्राम समेळ हा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या नाटकाबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडे आहे. येत्या दोन दिवसात याबद्दल अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटकडून ग्रीन सिग्नल
गेल्या अडीच वर्षांत घडलेल्या घडामोडींनंतर राज्यात विधानभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दावे प्रतिदावे सुरू आहेत. अशातच या नाटकाची घोषणा झाल्यामुळे या नाटकात नक्की काय पाहायला मिळणार, याबाबातही उत्सुकता वाढू लागली आहे. राज्यातील सत्तांतरापूर्वी धर्मवीर सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच एकनाथ शिंदेंनी 40 आमदरांसह शिवसेना सोडली, त्यानंतर आता जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. तसतशा घडामोडींनाही वेग आला आहे. विशेष म्हणजे धर्मवीर-2 सिनेमाही येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटातून आणि नाटकातून नेमकं काय पाहायला मिळणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा: अमरावतीत राजकारण तापलं; पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची