कुर्ला अपघातातील मृत आणि जखमींची नावे आली समोर, पाहा संपूर्ण लिस्ट
Kurla Bus Accident News In Marathi: मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस रोडवर काल (9 डिसेंबर) झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 49 जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या बेस्ट बसने 100 मीटरच्या परिघात 40 वाहनांना धडक दिली.परिसरातील नागरिकांनी तत्काळ सर्व जखमींना कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा आणि इतर खासगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना सोमवारी रात्री ९.५० वाजता घडली. मुंबईतील पश्चिम कुर्ला भागातील एल वॉर्डसमोरील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळ एसजी बर्वे रोडवर हा अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी बस अनियंत्रित अवस्थेत गर्दीच्या परिसरात घुसल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला. बसने 100 मीटर अंतरावर 30-40 वाहनांना धडक दिली. त्यामुळे रस्त्यावर व वाहनांमध्ये बसलेले काही जण जखमी झाले.
बेस्ट बसचा क्रमांक MH-01, EM-8228 आहे. ही बेस्ट इलेक्ट्रिक बस होती जी कुर्ला स्थानकातून अंधेरीच्या दिशेने जात होती. अपघातातील जखमी आणि मृतांची नावे समोर आली आली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कनिस अन्सारी (वय 55), आफरीन शाह (वय 19), अनाम शेख (वय 20), शिवम कश्यप (वय 18), विजय गायकवाड (वय 70), फारुख चौधरी (वय 54) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यापैकी चौघे हे कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल होते तर एक कोहिनूर रुग्णालयात आणि अन्य एक मृत व्यक्ती हबीब रुग्णालयात होती. या सहा जणांच्या अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांच्या शोकाला पारावार उरलेला नाही.
तर बसच्या धडकेमुळे 40 जणांहून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यापैकी काही जणांवर भाभा रुग्णालय, सिटी हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स रुग्णालय, हबीब रुग्णालय, सायन हॉस्पिटल, फौझिया रुग्णालय, कुर्ला नर्सिंग होम अशा विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे अशी माहिती समोर आली आहे.
कुर्ला अपघातातील मृत आणि जखमींची नावे
दरम्यान, ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, असे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले. चालक घाबरला त्यामुळे ब्रेक दाबण्याऐवजी त्याने एक्सलेटर दाबला आणि बसचा वेग वाढला. तर दुसरीकडे संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या असल्फा परिसरात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. तर संजय मोरे कंत्राटी चालक म्हणून 1 डिसेंबरला बेस्टमध्ये रुजू झाला. मात्र संजय मोरेने काल (9 डिसेंबर) पहिल्यांदा बेस्ट चालक म्हणून काम केले. संजयने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याचे समजते. त्यामुळेच हा अपघात झाला. बसवरील नियंत्रण सुटले अन् कुर्लातील हा भीषण अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.