
राज-उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्र्यांची जळजळीत टोला (Photo Credit- X)
नेमका वाद काय?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे यांनी प्रथमच एकाच व्यासपीठावरून मुलाखत दिली. या मुलाखतीत दोन्ही नेत्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप सत्ताधारी महायुतीवर केला. या आरोपाचा समाचार घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीसांचा ‘फुकटचा सल्ला’
उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी त्यांना एवढाच सल्ला देईल की, कृपया तुमचे जे स्क्रिप्ट रायटर आहेत, त्यांना आता बदला. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही त्याच त्याच गोष्टी बोलत आहात. जे प्रश्न अस्तित्वातच नाहीत, त्यावर केवळ मतं मांडण्याचे काम सुरू आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कोण तोडू शकतं? तर उत्तर आहे, कोणीच नाही, हे त्यांनाही चांगले ठाऊक आहे.
भाजपच्या निशाण्यावर आले महेश मांजरेकर; ठाकरे बंधूंची मुलाखत घेताच राजकारण न पडण्याचा सल्ला
२५ वर्षांचा हिशोब द्या
पुढील प्रहार करताना फडणवीस म्हणाले की, या नेत्यांकडे विकासावर बोलण्यासारखे काहीही नाही. गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर त्यांची सत्ता होती, पण आज जनतेला सांगण्यासारखे एकही मोठे काम त्यांच्याकडे नाही. त्यामुळेच जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी अशा प्रकारचे भावनिक मुद्दे उकरून काढले जात आहेत. माझी ही गोष्ट कदाचित त्यांना आवडणार नाही, पण तुमचा स्क्रिप्ट रायटर बदलल्याशिवाय आता पर्याय नाही.
मुंबई कुणीच तोडू शकत नाही
राज ठाकरे यांनीही मुंबई तोडण्याच्या मुद्द्यावर भाष्य केल्याचे फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले, ही स्क्रिप्ट आता जुनी झाली आहे आणि ती विकत घेणारा आता कोणी उरलेला नाही. जोपर्यंत या जगात चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार आहे, हे महाराष्ट्रातील आणि मुंबईतील प्रत्येक नागरिकाला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे अशा भीतीदायक गोष्टी पसरवून मते मिळवण्याचा प्रयत्न आता यशस्वी होणार नाही.