
"चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार", प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका
मुंबई : मुंबईतून मराठी माणूस कोणी बाहेर फेकला, मेट्रोची कामं कोणी रोखली, एसआरए योजना कोणी आणली, गिरणी कामगार कोणी उद्ध्वस्त केला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नयेत, म्हणून त्यांनी मराठीचा मुद्दा काढलाय, मात्र त्यांना मराठी माणसाशी काही घेणंदेणं नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उद्धव व राज ठाकरेंवर केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाजन यांनी उबाठा मनसे युतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, मुंबईवर नियंत्रण कोणाचे असावे, यासाठीच दोघांमध्ये वाद होता. २० वर्षांचा वाद १० मिनिटांत कसा मिटला, असा सवाल महाजन यांनी केला. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचा जीव मुंबई, ठाणे, नाशिक पुणे या गोल्डन ट्रॅंगलमध्ये अडकला आहे. त्यासाठी सर्व मराठी माणसाला वेठीस धरण्याचे काम सुरु आहे. ते मराठी माणूस ओळखून आहे, असे महाजन म्हणाले. कोहिनूरमधील गिरणी कामगारांना आणि त्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी पहिल्या जाहीर सभेत दिले होते. त्याचे पुढे काय झाले, शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून मुंबईत मायकल जॅक्सनचा शो ठेवला होता. त्यातून उभारलेल्या निधीतून किती मराठी मुलांना उद्योजक केले, असे सवाल महाजन यांनी यावेळी उपस्थित केले.
महाजन पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना गुजरातचा राग आळवल्याशिवाय त्यांचे दुकानच चालू शकत नाही, अशी टीका महाजन यांनी केली. दोन्ही भाऊ एकत्र येऊन सुद्धा राज ठाकरे आनंदी नाहीत. उबाठाने मनसेला पुण्यात केवळ २५ जागा आणि नाशिकमध्ये २७ जागा देऊन बोळवण केली. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची राजकीय पत ओळखली, असे महाजन म्हणाले. उबाठासमोर मनसे सरेंडर झाली, अशी टीका महाजन यांनी यावेळी केली. यापूर्वी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांबाबत राज ठाकरे यांनी आज भूमिका मांडायला हवी, असे महाजन म्हणाले.
मुंबई समजून घेण्यासाठी मुंबईत जन्माला यायला हवं या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा महाजन यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, मुंबईचा विकास हा मुंबई बाहेर जन्मलेल्यांनीच केला. नितीन गडकरी यांनी मुंबईत अनेक उड्डाणपूल बांधले. मुंबईतील रस्त्यांची कामं कोण करतयं. मुंबईत जन्मलेले पण चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार, अशी टीका महाजन यांनी ठाकरेंवर केली.