local train (फोटो सौजन्य: social media)
मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या ! मुंबाची जीवनवाहिनी अर्थातच लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे बाहेर पडतांना तुम्ही एकदा वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. काही अभियांत्रिकी कारणावरून आणि रेल्वे ट्रैक देखभालीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार, हार्बर लाईन वर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे यादरम्यान मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार आहे.
Mumbai Metro : मुंबई मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर २१ वाढीव फेर्या, आता दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार
१) मध्य रेल्वे ( Central railway )
मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
२) पश्चिम रेल्वे (western railway)
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार आहे.बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक नियोजित केला आहे. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत, बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान धीम्या मार्गावर धावणाऱ्या अनेक उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील, शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील किंवा जलद मार्गावर वळवल्या जातील. बोरिवलीच्या पलीकडे धावणाऱ्या हार्बर लाईन गाड्या आणि सेवा सामान्यपणे सुरू राहण्याची अपेक्षा असली तरी. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना थोड़ा विलंब होऊ शकतो.
३)हार्बर लाईन (Harbour line)
हार्बर लाईन वर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे यादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे हार्बर लाईन वर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगा ब्लॉक राहील. त्यामुळे सीएसएमटीहून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या डाउन हार्बर लाईन सेवा आणि सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ पर्यंत वांद्रे / गोरेगावला जाणाऱ्या डाउन हार्बर लाईन सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीसाठी यूपी हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीसाठी यूपी हार्बर लाईन सेवा बंद राहतील. पनवेल ते कुर्ला दरम्यान कुर्ला फलाट क्र. आठ वरून विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात (Mumbai Local Mega Block) सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे.