पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चर्चगेट स्थानकात ओव्हरहेड वायरवर अडकले जॅकेट(फोटो सौजन्य-ट्विटर)
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकात ओव्हरहेड वायरवर जॅकेट अडकल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले. संध्याकाळच्या ऐन पीक अवरच्या वेळेत लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावरुन परतणाऱ्या प्रवाशांची हाल झाले.
चर्चगेट स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या ओव्हरहेडवर जॅकेट अडकल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेची विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. वायरवर पडलेलं जॅकेट काढण्याचे RPF जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मध्य रेल्वेचे बिघाडसत्र थांबायचं नावचं घेत नाही. मध्य रेल्वेवरील डोंबिवली आणि कल्याणदरम्यान एका एक्सप्रेस गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान ही एक्सप्रेस गाडी लोकमान्य टिळक टर्मिन्सवरुन रवाना झाली होती. त्याच वेळी अचानक या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. याबद्दलची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने ठाकुर्लीच्या दिशेने नवीन इंजिन रवाना केले आहे. हे नवीन इंजिन त्या गाडीला लावले जाणार आहे. त्यानंतर ही एक्सप्रेस गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.