

प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या अल नीनीच्या प्रभावामुळे भारतासह संपूर्ण भारतीय उपखंडाला हवामानाच्या तीव्र संकटाचा सामना करावा लागू शकतो. आगामी काळात अल नीनोचे रूपांतर सुपर अल नीनोमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, गेल्या अनेक दशकांतील ही सर्वाधिक तीव्र स्थिती ठरू शकते, असा इशारा हवामानविषयक अहवालांतून देण्यात आला आहे. यामुळे काही भागांत अतिवृष्टी आणि पूर, तर अन्य भागांत दुष्काळ आणि पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. काठमांडूस्थित आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वतीय विकास केंद्र (आयसीआयएमओडी), बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटी आणि चिनी विज्ञान अकादमीच्या संस्थेने संयुक्तपणे तयार केलेल्या 'हिंदुकुश हिमालय विंटर आउटलुक २०२६' या अहवालात आगामी हिवाळ्यातील हवामानाबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसह काही देशांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – AI)
हिमालयीन क्षेत्राला नैसर्गिक आपत्तींचा धोका
पश्चिम हिमालयातील काही भागांत अतिवृष्टी आणि हिमवृष्टीमुळे पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाच्या घटना घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, हिंदुकुश हिमालयातील काही प्रदेशांत दीर्घकाळ कोरडे हवामान राहण्याचा अंदाज असून, त्यामुळे जंगलातील वणव्यांचा धोका वाढू शकतो.
दूध उत्पादनात घट होण्याची शक्यता
पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्णतेच्या लाटांमुळे जनावरांचा मृत्युदर वाढण्याबरोबरच दूध उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. अल नीनोचा परिणाम भारतीय मॉन्सूनवर झाल्यास खरीप हंगामातील भात, कापूस, ऊस आणि मका या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला पावसाच्या कमतरतेचा फटका बसण्याची भीती आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
१९५० नंतर सर्वाधिक तीव्र
अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासनाने अल नीनोची तीव्रता विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संस्थेच्या अंदाजानुसार, १९५० पासून नोंदविलेल्या स्थितींपैकी सर्वाधिक तीव्र अल नीनो निर्माण होण्याची शक्यता सुमारे ६० टक्के आहे. मात्र, त्याचा भारतातील मॉन्सूनवर नेमका किती परिणाम होईल, हे आगामी हवामान अंदाजांवरूनच स्पष्ट होईल.