Mumbai Gets New Tourist Attraction with Grand Light and Sound Show ( मुंबईला मिळाले नवीन पर्यटन आकर्षण: भव्य प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रम )
पवई तलाव येथील गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन रविवारी सायंकाळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्हाडाच्या स्लम बोर्डाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांच्यासह म्हाडा आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, की सुमारे १८० मीटर लांबीचा हा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन देशातील सर्वात मोठ्या फाउंटन्सपैकी एक ठरणार आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या शौर्याची गौरवगाथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भव्य स्वरूपात सादर केली जाणार आहे. मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांनी या शोचा आनंद घ्यावा. पवई तलावाचे नैसर्गिक सौंदर्य जपण्याबरोबरच त्याच्या स्वच्छतेसाठीही विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो साकारण्यात आला आहे. यामध्ये संगीतमय कारंजे, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांसारख्या आकर्षक सुविधांचा समावेश आहे. विशेष दृश्य परिणामांच्या माध्यमातून तीन वेगवेगळे चित्रपट सादर केले जाणार असून, इतिहास, संस्कृती आणि वारशाचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.
या फाउंटनचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाण्याचे एरेशन (हवामिश्रण) या प्रक्रियेमुळे दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्यास मदत होणार असून, पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय बाष्पीभवनामुळे परिसरात थंडावा निर्माण होणे आणि स्थानिक तापमानात घट होणे असे संभाव्य पर्यावरणीय फायदेही अपेक्षित आहेत.
उद्घाटनानंतर म्युझिकल फाउंटनचा पहिला शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आधुनिक तंत्रज्ञान, इतिहास आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा प्रकल्प मुंबईच्या पर्यटन नकाशावर पवई तलावाला नवे स्थान मिळवून देणारा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Satara News : माण तालुक्यात चारा छावण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर! बिजवडीत २३ नोव्हेंबरला रास्ता रोको






