
चेंबूरच्या छेडा नगर परिसरात वन विभागाच्या अखत्यारीतील सुमारे 10.25 हेक्टर खारफुटीची जागा आहे.अतिक्रमण, भराव यांमुळे अडकल्या गेलेल्या खाडीच्या पाण्याच्या अभावाने या जमिनीवरील खारफुटीला धोका निर्माण झाला होता. मात्र, स्थानिक रहिवासी आणि वन विभागाच्या सहाय्याने माजी खासदार राहुल शेवाळे यांनी या खारफुटीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला. या जागेत चर खणून सुमारे 2000 खारफुटीच्या झाडांची लागवड करण्यात आली असून वन विभागाकडून या कांदळवनाचे संरक्षण प्राधान्याने करण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या प्रतिसादानंतर इतर ठिकाणच्या कांदळवनाचे देखील अशाच पद्धतीने पुनरुज्जीवन करण्यात येईल, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
छेडा नगर परिसरातील ही खारफुटीची जमीन पूर्व उपनगरातील पर्यावरणाच्या संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावते. छेडा नगर रेसिडेंट्स असोसिएशच्या मागणीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून इथल्या कांदळवनाच्या संरक्षणासाठी माझ्या वतीने पाठपुरावा सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह या जमिनीवर खारफुटीची लागवड केली. अशाच पद्धतीने मुंबईतील कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी लोकसहभागातून हे अभियान आणखी प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
-राहुल रमेश शेवाळे, माजी खासदार
मुंबईला पुराच्या धोक्यापासून वाचविणाऱ्या आणि पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या खारफुटीतून इतर वृक्षांच्या तुलनेत 6% अधिक प्राणवायू उत्सर्जित केला जातो. तसेच, याठिकाणी खेकडे, कीटक आणि इतर जलचरांची एक इकोसिस्टीम तयार होते. इथे ठरावीक काळात मोठ्या प्रमाणात पक्षांचे स्थलांतर होते. त्यामुळे मुंबईत खारफुटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.