
Pratap Sarnaik : 'मराठी संवाद भाषा'; अमराठी चालकांनी अभियानात सहभागी व्हावे, परिवहनमंत्र्यांचे आवाहन
महाराष्ट्रात व्यवसाय करताना येथील नागरिकांशी दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मराठी भाषेत संवाद साधता येणे महत्त्वाचे आहे. रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद भाषा अभियानात’ सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केले आहे.
‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या पुढील टप्प्याच्या नियोजनासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस परिवहन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रदीप ढवण, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले, मराठी विश्वकोश मंडळाचे डॉ. शामाकांत देवरे तसेच राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
महाराष्ट्रात राहून व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक प्रवासी वाहनचालकाला प्रवाशांशी सहज आणि आत्मविश्वासाने संवाद साधता यावा, या उद्देशाने परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० हून अधिक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरू करून, सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिक्षाचालकांची संख्या ४ लाख ४० हजार २३८, तर टॅक्सीचालकांची संख्या ४३ हजार १०६ इतकी आहे. या सर्व चालकांनी मराठी भाषा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण केंद्रांबरोबरच ऑनलाइन माध्यमातूनही व्यावहारिक मराठी शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक<< यांनी सांगितले. दरम्यान, व्यावहारिक मराठीसंदर्भातील सुधारित नियमांच्या अंमलबजावणीला १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, ही स्थगिती म्हणजे नियम रद्द झाले आहेत, असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा आणि भविष्यात नियमांची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी स्वतःला तयार करावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.
पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
‘आजच मराठी शिका, उद्याच्या नियमांसाठी सज्ज व्हा!’ या भावनेतून राज्यातील सर्व अमराठी रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित वाहनचालकांनी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मोठ्या संख्येने चालक प्रशिक्षणासाठी उपलब्ध होत असलेल्या ठिकाणी स्थानिक शाळा अथवा इतर उपलब्ध जागांचा वापर करून प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आवश्यक समन्वय साधावा, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.