
नवी मुंबई पोलीस प्रशासना
नवी मुंबई / सावन वैश्य : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 15 मे 2026 रोजी करण्यात आलेल्या कर्मचारी वर्गाच्या सर्वसाधारण बदल्यांनंतरही काही अंमलदारांना अद्याप त्यांच्या जुन्या नियुक्तीच्या ठिकाणाहून कार्यमुक्त (रिलीव्ह) करण्यात आले नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. विशेषतः वाहतूक शाखेतील काही अंमलदार आजही जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे बोलले जात असून, त्यामुळे बदली आदेशांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
माहितीनुसार, रबाळे, तुर्भे, वाशीसह काही वाहतूक विभागांतील अंमलदारांची इतर शाखांमध्ये बदली करण्यात आली होती. मात्र, जवळपास दोन महिने उलटूनही काही कर्मचाऱ्यांना अद्याप रिलीव्ह करण्यात आलेले नाही. याउलट, इतर अनेक कर्मचारी बदली आदेश मिळाल्यानंतर तत्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. यामुळे बदली प्रक्रियेत सर्वांसाठी समान निकष लागू केले जात आहेत का, असा प्रश्न कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. काही संवेदनशील व महसूलदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाहतूक ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप कार्यमुक्त न केल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
याचबरोबर, सर्वसाधारण बदलीनंतर पोलीस आयुक्तालयाकडून विनंती बदलीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे 150 हून अधिक कर्मचाऱ्यांनी विविध कारणांसाठी विनंती अर्ज सादर केले होते. यामध्ये आई-वडिलांची प्रकृती, मुलांचे शिक्षण, पत्नीच्या नोकरीचे ठिकाण, कौटुंबिक अडचणी आदी कारणांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, त्यापैकी केवळ 26 कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जांचा विचार करून बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे उर्वरित शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांच्या अर्जांकडे दुर्लक्ष करण्यात आले का, अथवा त्यामागे अन्य प्रशासकीय कारणे आहेत, याबाबत पोलीस दलात चर्चा सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांच्या मते, बदलीचे नियम सर्वांसाठी समान असताना काही वरिष्ठांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी मुदतवाढ अथवा स्थगिती मिळत असल्याची भावना कर्मचारी वर्गात व्यक्त होत आहे.
वेळेत अंमलबजावणी होणे आवश्यक
पोलीस दलातील पारदर्शकता, समानता आणि प्रशासनावरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सर्व बदली आदेशांची एकसमान आणि वेळेत अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या अधिकृत स्पष्टीकरणाकडे लागले लक्ष
या संपूर्ण प्रकरणाबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे रिलीव्ह न झालेल्या कर्मचाऱ्यांना कधी कार्यमुक्त केले जाणार, तसेच विनंती बदली अर्जांबाबत प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण दिले जाणार का, याकडे पोलीस कर्मचारी आणि संबंधितांचे लक्ष लागले आहे.