आषाढी वारी 2026 (फोटो- टीम नवराष्ट्र)
टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद, भगव्या पताका हाती घेऊन, डोक्यावर तुळस, लाखो कंठातून घुमणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला. पुणे शहर विठ्ठलमय झाले असताना वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता आणि सेवाभावाच्या परंपरेचे पुणेकरांनी जल्लोषात स्वागत केले. पालखी मार्गावर विविध स्वंयसेवी संस्था, गणेश मंडळ आणि पुणेकरांनी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विविध गरजेच्या वस्तुंचे, त्याचप्रमाणे पाणी, चहा, खाद्यपदार्थांचे वाटप केले.
पारंपारिक पद्धतीने औक्षण
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ उपक्रमांतर्गत दोन्ही पालखी सोहळ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे महापौर नागपुरे यांनी औक्षण केले आणि पादुकांचे दर्शन घेतले.
जगदगुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आकुर्डी येथील मुक्काम झाल्यानंतर गुरुवारी सकाळी पुण्याकडे निघाला. तर आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने निघाला. पुणेकरांच्यावतीने महापौर नागपुरे यांनी अनुक्रमे बोपोडी आणि कळस येथे या पालखी सोहळ्यांचे स्वागत केले. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, राष्ट्रवादी गटनेते सोपान सोपान चव्हाण, पक्षनेते नितीन गावडे, आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पुणे महानगरपालिका अधिकारी तसेच स्थानिक नागरिक व वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखीच्या स्वागतासाठी पुण्यातील मंदिरे सज्ज; मंडप, रोषणाईसह वारकऱ्यांच्या सुविधांची तयारी पूर्ण
पालखीच्या स्वागतासाठी पुण्यातील मंदिरे सज्ज
पालखी विठोबा मंदिर परिसरातही महापालिकेच्या सहकार्याने रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यंदाच्या वारीमध्ये ‘हरित वारी, स्वच्छ वारी’ हा संदेश देण्यात येणार असून स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार आहे. पालखी विठोबा मंदिरात दरवर्षी जागेअभावी भाविकांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अन्यत्र हलविण्याची चर्चा सुरू होती. मात्र यंदा मंदिराशेजारील खासगी जागा शासनाच्या सहाय्याने मंदिर परिसरात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा अधिक प्रशस्त मंडप उभारण्यात आला असून दर्शनासाठी सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहे. ‘सर्व तयारी पूर्ण झाली असून आता केवळ पालखीच्या आगमनाची प्रतीक्षा आहे,’ असे विश्वस्त गोरखनाथ भिकुले यांनी सांगितले.






