राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, चार नवीन रेल्वे पोलीस ठाण्यांना मंजुरी
भाईंदर/ विजय काते : उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी आणि त्यासोबत वाढणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई रेल्वे पोलिसांतर्गत चार नवीन रेल्वे पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), भाईंदर, अंबरनाथ आणि आसनगाव या चार महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. गृह विभागाने यासंदर्भातील आदेश सोमवारी जारी केला असून लवकरच ही ठाणे प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहेत.
मुंबईची उपनगरीय रेल्वे वाहतूक ही जगातील सर्वाधिक गर्दीची लोकल सेवा मानली जाते. रोज लाखो प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करतात. गेल्या काही वर्षांत मिरा रोड, भाईंदर, अंबरनाथ आणि आसनगावसारख्या उपनगरी स्थानकांवरील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, गर्दी वाढली तशी गुन्हेगारीची प्रकरणेही वाढली. चोरी, पाकिटमारी, छेडछाड, मारहाण, अपघात आणि लैंगिक अत्याचार यासारख्या घटनांनी पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
मिरा भाईंदर परिसरातील प्रवाशांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. आतापर्यंत या भागातील रेल्वे गुन्ह्यांच्या तक्रारीसाठी वसई रेल्वे पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. वसईचे अंतर खूप असल्याने तक्रारदारांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होता. शिवाय, प्रत्येक वेळेस चौकशीसाठी वसई गाठणे ही डोंगराएवढी समस्या होती. यामुळे अनेक प्रवाशांनी तक्रार देण्याचे टाळले. मात्र आता भाईंदरला स्वतंत्र रेल्वे पोलिस ठाणे उभारले जाणार असल्याने हा त्रास संपणार आहे.
वसई रेल्वे पोलीस ठाणे हे प्रचंड कामाच्या ओझ्याखाली दबले आहे. मुंबई ते दहाणू या विस्तृत पट्ट्यातील रेल्वे स्थानकांवरील सर्व गुन्हेगारी व कायदा-सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी वसई पोलिसांवर होती. नवीन चार पोलिस ठाण्यांमुळे वसईच्या जबाबदारीत मोठी कपात होणार आहे. परिणामी, तपासाचा वेग वाढणार असून प्रवाशांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई शक्य होणार आहे.
रेल्वे प्रवासात महिलांची सुरक्षा हा कायमच चिंतेचा विषय राहिला आहे. गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड काढणे, गैरवर्तन करणे, मोबाईल किंवा बॅग हिसकावणे यासारख्या घटना सर्रास घडत होत्या. नवीन पोलीस ठाण्यांमुळे यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. स्थानकांवर गस्त वाढवली जाईल आणि महिलांसाठी तक्रार प्रक्रिया सोपी केली जाणार आहे.
1. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)
2. भाईंदर रेल्वे स्टेशन
3. अंबरनाथ रेल्वे स्टेशन
4. आसनगाव रेल्वे स्टेशन
राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता लवकरच या ठाण्यांचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, तांत्रिक साधनसामग्री आणि आवश्यक संसाधने लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना जवळच्या ठिकाणी तक्रार नोंदवता येणार.
तक्रारींची तत्काळ नोंदणी आणि जलद तपास होणार.
महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी वाढणार.
चोरी, छेडछाड आणि अन्य गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण.
वसई पोलिस ठाण्याचा ताण कमी होणार.
रेल्वे प्रवास सुरक्षीत होण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने उचललेले हे पाऊल एक मोठा दिलासा देणारे ठरणार आहे.