इंदापूर : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे शेतातील एका विहिरीचे रिंग बांधकाम सुरु होते. त्याचदरम्यान रिंग पडून मुरूम (Murum Collapsed) ढासळला. या दुर्घटनेत बेलवाडी गावातील चार मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आले. यातील अडकलेल्या चार मजूरांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
म्हसोबाची वाडी येथे सोमवारी (दि. 1) रात्री ही घटना घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाकडून जेसीबी, पोकलेन तसेच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद भोईटे, बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार व कर्मचारी वर्ग तसेच इंदापूरचे तहसीलदार घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
विहिरीची भिंत कोसळून अपघात
म्हसोबाची वाडी या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या विहिरीची भिंत कोसळली. त्याखाली चार ते पाच लोक अडकल्याची शक्यता आहे. 100 मीटर व्यासाची ही विहिर खोदली जात होती तर तिची खोली सुमारे 30 ते 40 मीटर आहे. एका बाजूची रिटर्निंग वॉलचे काम पूर्ण झाले होते.