पतंग उडविणाऱ्यांवर ड्रोनने नजर
नागपूर : आतापर्यंत बंदी असलेला लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आल्यानंतरही लोक छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विकत घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी कोणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी पोलिस विभाग नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवणार आहे. नायलॉनच्या मांजाने पतंग उडवताना दिसल्यास त्याची संक्रांत पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये साजरी होणार आहे.
पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस सर्व बाजारपेठेत पायी गस्त घालत असून, पतंग व मांजा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवून आहेत. पतंग उडवताना नायलॉनचा मांजा वापरताना दिसल्यास संबंधितांवर बीएनएस कलम 223 आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. जास्तीत जास्त 6 महिने तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय 5 हजार रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असे सिंगल म्हणाले.
एक लाखाचा नायलॉन मांजा केला जप्त
पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गस्तीदरम्यान मोमीनपुरा परिसरात बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक केली. मोहम्मद समीर जिमल अन्सारी (वय 19, रा. टाकिया दिवाणशाह) असे आरोपीचे नाव आहे. गस्तीदरम्यान दिवाणशहा टाकिया परिसरात एक तरुण नायलॉन मांजा विकत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. या बातमीच्या आधारे पोलिस पथकाने परिसरात छापा टाकला.
प्लास्टिक पिशवीतून काहीतरी विकताना दिसला अन्…
समीर 2 प्लास्टिक पिशव्यांमध्ये काही वस्तू विकताना दिसला. त्याला पकडून पिशवीची झडती घेतली असता 62 राउंड नायलॉन मांजा आढळून आला. पोलिसांनी एक लाख रुपयांचा माल जप्त केला असून, समीरविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तरुणांची होऊ शकते तपासणी
परिमंडळातील डीसीपींच्या देखरेखीखाली ठिकठिकाणी ड्रोनद्वारे टेहळणी केली जाणार आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागात पतंगबाजीचे प्रमाण अधिक आहे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. संशय आल्यास दाट लोकवस्तीच्या भागात गच्चीवर जाऊन तरुणांची तपासणी देखील होऊ शकते.