
नागपूर महापालिकेत चौरंगी लढत; आता 992 उमेदवार असणार निवडणुकीच्या रिंगणात...
नागपूर : निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यात नामनिर्देशन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एकूण ३०२ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. १ आणि २ जानेवारी २०२६ रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट झाले. प्राप्त माहितीनुसार, नामांकन माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला केवळ १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते, तर दुसऱ्या व अंतिम दिवशी २ जानेवारीला मोठी हालचाल दिसून आली. तब्बल २९० उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेनंतर आता चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १२९४ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते. यामध्ये ७५९ पुरुष आणि ५३५ महिला उमेदवारांचा समावेश होता. छाननीदरम्यान विविध प्रभागांतील ८० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून, त्यात ४१ पुरुष आणि ३९ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
नियमांनुसार २ जानेवारीला दुपारी २.३० वाजेपर्यंत नामांकन वापसीची मुदत दिली होती. या कालावधीत ३०२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काही प्रभागांमध्ये चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे, तर काही प्रभागांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांमध्ये थेट सामना होणार असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुकीची धग वाढली आहे.
दरम्यान, लकडगंज झोनमध्ये सर्वाधिक ४० उमेदवारांनी माघार घेतली, तर लक्ष्मीनगर झोन सर्वात कमी म्हणजेच, केवळ १२ उमेदवारांनी माघार घेतली. धरमपेठ झोनमध्ये २४, हनुमाननगर झोन २८, धंतोली व नेहरूनगर झोनमध्ये प्रत्येकी ३३ उमेदवारांनी माघार घेतली. गांधी महाल झोनमध्ये ३०, सतरंजीपुरा झोन ३५, आशीनगर झोनमध्ये २७, तर मंगळवारी झोनमध्ये ३७ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
हे देखील वाचा : “मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य