विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (1 जुलै) दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. यामुळे विधानसभा ५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस आमदार नाना पटोले यांना संपूर्ण दिवसासाठी विधानसभेतून निलंबित केले. विधीमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री संजय बनसोडे आणि आमदार अभिमन्यु पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला.
नाना पटोले यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून शेतकऱ्यांविरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये सुरू असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. त्यावेळी नाना पटोले अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जागेजवळ गेले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला. त्यानंतर नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले.
ड्रंक अँड ड्राईव्ह टेस्टला नकार, फाशी घेण्याची पोलिसांना धमकी; नेमकं काय घडलं?
नाना पटोले म्हणाले की, बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वेगवेगळी विधाने करून शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. पण आता हा अपमान शेतकरी सहन करणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल, पण ते शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. अशी वक्तव्ये अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत.त्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत पटोलेंनी संताप व्यक्त केला.त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, नाना पटोले तुमच्याकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणे, मला योग्य वाटत नाही, हे चुकीचे आहे.
राहुल नार्वेकरांनी बजावल्यानंतर नाना पटोले यांन विधानसभा अध्यक्षांच्या जागेजवळ जात आपला संताप व्यक्त केला. त्यनंतर नार्वेकरांनी सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब केले. राहुल नार्वेकर म्हणाले, नाना पटोले सभागृहाचे अध्यक्ष राहिले आहेत. राजदंडाला हात लावल्यानंतर काय कारवाई केली जाते, याची त्यांना कल्पना असेलच, मला कारवाई करायला भाग पाडू नका, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
Rules Change: ट्रेन तिकिटांपासून LPG गॅसच्या किमतीपर्यंत…आजपासून लागू बदल, खिशावर येणार ताण
त्याचवेळी, नाना पटोलेंनी अशा पद्धतीने अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही. त्यांनी माफी मागावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांच्या मागणीने सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज चाललं पाहिजे, यासाठी मी नाना पटोले यांना निलंबित करत आहे, असे सांगत राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंना निलंबित केलं. त्यानंतर नाना पटोले सभागृहातून बाहेर निघून गेले. या सर्व प्रकारानंतर विरोधकांनीही सभात्याग केला.