संग्रहित फोटो
पुणे : दारुच्या नशेत कार चालविणार्याला पोलिसांनी थांबविल्यानंतर मात्र त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी ड्रंक अँड ड्राईव्हच्या चाचणीला विरोध करून आरडाओरडा केला. तसेच, फाशी घेऊन जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, यावेळी पोलिसांना चालकाकडे रिव्हॉल्व्हर मिळून आले आहे.
याप्रकरणी, लष्कर पोलिसांनी अरुण निवृत्ती सूर्यवंशी (वय ५०, रा. सेक्टर नं. 8, एरोली, नवी मुंबई), बाबुराव धर्माजी आंबेगावे (वय ५५, रा. सोमराणा ता. उदगिर, जि. लातूर) आणि लक्ष्मण प्रल्हाद पाटील (वय ३९, रा. रिव्हर्व्य सोसायटी, कदमवाक वस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी विजय राम सुतार यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार पुलगेट पोलीस चौकीच्या समोर २९ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुलगेट पोलीस चौकीसमोर रविवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पोलिस नाकाबंदी करून वाहने तपासत होते. त्यावेळी हा ठेकेदार सुर्यवंशी व त्याचे दोन साथीदार कारमधून आले. त्यांनी मद्यप्राशन केले असल्याचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी कार बाजूला घेऊन ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अरुण सूर्यवंशीने कारवाईला नकार देऊन सरकारी कामात अडथळा आणला.
नाकाबंदी दरम्यान कायदेशीर कर्तव्य करताना पोलिसांबरोबर वाद घालून त्यांच्या अंगावर धावून आले. हातवारे करुन मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलिसांना शिवीगाळ करुन अरुणने दारुच्या नशेत मी स्वत:ला फाशी लावून घेऊन माझ्या जीवाचे बरे वाईट करुन घेईल, अशी धमकी दिली. तो स्वत:च्या कमरेला हात लावून काहीतरी शोधत होता. तो दारुच्या नशेत असल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला रिव्हॉल्व्हर मिळून आले. आरोपी हा ठेकेदार असून त्याच्याकडे रिव्हॉल्व्हरचे लायसन्स आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली.
हे सुद्धा वाचा : नगर रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकवर टेम्पो आदळून चालकाचा मृत्यू
कात्रज घाटात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
कात्रज घाट परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२८ जून) रात्री घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकावर आंबेगाव पोलिसांत गु्न्हा नोंद केला आहे. कैलास नारायण आखुटे (वय५६, रा. संभाजीनगर, कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षदरम्यान आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करत आहेत.