
MP Ashok Chavan informed discussions between BJP and Shiv Sena for Nanded Municipal Corporation election
Nanded Politics : नांदेड : आगामी नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होण्याचे स्पष्ट संकेत खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. वरिष्ठ स्तरावर दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगत, नांदेड मनपासाठी लवकरच औपचारिक बोलणी सुरू होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती होण्याची शक्यता खासदार चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. “प्रदेश पातळीवर राष्ट्रवादीशी कोणतीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे नांदेड महापालिकेतही राष्ट्रवादीसोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे नांदेडच्या राजकारणात नवे संकेत मिळाले असून, राष्ट्रवादीची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : घोषणेची उत्सुकता ती लवकरच…! ठाकरे बंधूंची चर्चा अंतिम टप्प्यात, उत्सुकता पोहचली शिगेला
माजी महापौर, उपमहापौर भाजपात
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात झालेल्या भव्य पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. यावेळी माजी महापौर जयश्री निलेश पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर तसेच मनसेचे नेते विनोद पावडे यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून जयश्री पावडे यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा शहरात रंगत होती. अखेर हा प्रवेश झाल्याने प्रभाग क्रमांक सहामधून भाजपाची उमेदवारी त्यांचीच निश्चित मानली जात आहे.
हे देखील वाचा : ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे हे देशद्रोही; पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदेंचा निशाणा
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मौन
खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी भाजपाच्या ताकदीवर भर देत सांगितले की, “भारतीय जनता पक्ष हा सध्या सर्वात मोठा आणि संघटनात्मकदृष्ट्या मजबूत पक्ष आहे. त्यामुळे नांदेड महापालिकेवर भाजपाचाच वरचष्मा राहील. राष्ट्रवादीसोबत युती न झाल्यास तो पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार की इतर पक्षांशी आघाडी करणार, याबाबत मात्र राष्ट्रवादीचे नेते मौन बाळगत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) अनिश्चितता
एकीकडे भाजप-शिवसेना युतीची शक्यता बळावत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेतील अनिश्चितता नांदेडच्या राजकारणात नवे वळण देणारी ठरणार आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे नांदेड मनपाची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
१८ डिसेंबर रोजी हक्क दिवस
नांदेड. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून १८ डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्याक दिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव माहिती होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयामध्ये अशासकीय समाजसेवी संस्थाच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यात भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद इत्यादीचा समावेश असावा. तसेच अल्पसंख्याक विकास विभागाचे १० डिसेंबर रोजीची परिपत्रकातील सूचनानुसार कार्यक्रमांचे आयोजन करावे.