अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन यावर्षी पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने येत्या शनिवारी म्हणजेच 2 ऑगस्टला काळी 10 वाजता, नवीन पनवेल येथे पक्ष सदस्यांचा मेळावा होणार आहे. शेकाप सरचिटणीसहसह अन्य दिग्गज मंडळी कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या मेळाव्यात विशेष उपस्थिती आहे ती म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या मेळाव्याची तयारी झाली आहे. गावोगावी, शहरी भागात ठिकठिकाणी कार्याकर्त्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमधून कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेकापचा वर्धापन दिन तथा मेळावा हा कार्यकर्त्यांना उमेद देणारा आहे. त्यामुळे या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्यादेखील प्रचंड असणार आहे.
या मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य खजिनदार अतूल म्हात्रे, शेकाप सोशल मिडीया प्रमूख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप सहचिटणीस अॅड. गौतम पाटील आदी दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी जोरात सुरु केली आहे. महिला, तरुण, युवक, ज्येष्ठ अशा सर्वच कार्यकर्त्यांना हा मेळावा एक वेगळी शक्ती, उमेद देणारा असणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. या मेळाव्यातून मिळालेली विचारांची शिदोरी घेऊन कार्यकर्ता एक वेगळ्या उमेदीने निवडणूकांसाठी कामाला लागणार आहे. त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी दिली. यावेळी तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते.