पिंपरी: सध्या सर्वत्र तीव्र उष्णतेचा पारा चढला आहे. देशभरात पुढील ४८ तास उष्णतेची लाट, गरम आणि दमट हवामान कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराला देखील या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे. उन्हात बाहेर पडताना डोकं झाकून ठेवावं. पुरेसे पाणी प्यावं आणि थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करावा असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार २६ एप्रिलनंतर महाराष्ट्रात उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत गरम हवामानाचा सामना करावा लागणार आहे. म्हणून तीव्र उन्हाच्या लाटेपासून वाचण्यासाठी दुपारी बारा ते चारच्या दरम्यान घरच्या बाहेर पडू नका. थेट सूर्यप्रकाश टाळा महत्वाच्या कामासाठी बाहेर पडावे असे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
याची घ्या अधिक काळजी
१) ६५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी.
२) १ वर्षांखालील आणि १ ते ५ वयोगटातील व मुलांनी उन्हात फिरू नये.
३) अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती यांनी काळजी घ्यावी.
उष्माघात होण्याची कारणे
१ ) उन्हाळ्यामध्ये मजुरीची कामे फार वेळ करणे.
२) कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.
३) जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. (जसे की, बेकरी, भेळीच्या भट्टया, विटभट्टी)
४) घट्ट कपड्यांचा वापर करणे
अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
उष्माघातची लक्षणे –
१) थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
२) भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा गोळे येणे
३) रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी.
प्रतिबंधात्मक उपाय :-
१) वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
२) कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
३) उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल, पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
४) जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे (तहान लागली नसेल तरीही).
५) सरबत प्यावे, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
६) अधूनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी.
७) वर नमूद केलेली लक्षणे आढळल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व डॉक्टराच्या सल्ल्याने उपचार सुरु करावा
८) उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवल, फेटा, उपरणे, छत्री इ.चा वापर करावा.
देशात सर्वत्र तीव्र उष्णतेची लाट पसरणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन आहे की,महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. शक्य तेवढे ऊन उतरल्यानंतर ४ वाजेनंतर घराबाहेर पडा. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी करत प्रशासनाला सहकार्य करावे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
येत्या ४८ तासांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शहरातील शाळा, वर्कशॉप्स व सार्वजनिक कार्यक्रमांबाबतही काळजी घ्यावी. उष्णतेसंदर्भातील सर्व उपचार पालिका रुगणालयात उपलब्ध आहेत. या काळात काही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील महानगरपालिकेच्या रुग्णालयाला भेट देऊन उपचार घ्या.
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी,
वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Web Title: Next two days heat wave in pimpri chinchwad city government appeal to people for care weather news