सावधान! २९ एप्रिलपर्यंत तिव्र उष्णतेची लाट येणार, IMD ने दिला इशारा
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यातचं तापमान ४५ अंशावर पोहोचलं आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी पुन्हा तिव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारतातील मैदानांमध्ये २९ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर पूर्व भारतात २६ एप्रिलपर्यंत तिव्र लाट येऊ शकते. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
पुढील सात दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारतात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, पश्चिम मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थान येथे २९ एप्रिलपर्यंत, तर पूर्व मध्य प्रदेशमध्ये २७ एप्रिलपर्यंत; उत्तर प्रदेश, विदर्भ (महाराष्ट्र), बिहार, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये २६ एप्रिलपर्यंत; छत्तीसगडमध्ये २५ एप्रिलपर्यंत; आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात २४-२५ एप्रिल रोजी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बिहारमध्ये २५ एप्रिलपर्यंत, ओडिशात २३-२४ एप्रिल आणि पश्चिम बंगालमध्ये २४-२५ एप्रिल दरम्यान काही भागांत उष्ण रात्रीसुद्धा जाणवू शकतात, असं IMD ने म्हटले आहे.
“वादळाची दिशा पश्चिमेकडे आणि उत्तर-पश्चिमेकडे बदलली आहे, त्यामुळे तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. हरियाणा, पंजाब, राजस्थान आदी भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे,” असं स्कायमेट वेदरचे हवामान व पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितलं.
मोहफुलातून आदिवासींना मिळाला हक्काचा रोजगार; फक्त दारू नाही, तर हे पदार्थही बनतात
दरम्यान, ईशान्य भारतात २७ एप्रिलपर्यंत जोरदार पावसाची शक्यता कायम असून, २६ एप्रिलपासून पूर्व भारतात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार आहे. मंगळवारी, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड येथे कमाल तापमान ४२ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान होते. तसेच, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशामध्ये अनेक ठिकाणी, तर पश्चिम मध्य प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र, सौराष्ट्र, कच्छ, तेलंगणामध्ये काही ठिकाणी आणि राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी तापमान खूप जास्त नोंदवले गेले. मंगळवारी सर्वात जास्त तापमान ओडिशामधील झारसुगुडा येथे ४६.२ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे.