Nishikant Dubey surrounded by Marathi women MP in Parliament lobby for Maharashtra controversial statements
नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पहिल्या दिवसापासून संसदचे अधिवेशन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठी खासदारांनी गाजवले आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणूस आणि मुंबईबाबत गरळ ओकली होती. मराठी माणसांना आपटून मारण्याच्या बाता खासदार निशिकांत दुबे यांनी मारल्या होत्या. महाराष्ट्रातील मराठी खासदारांनी निशिकांत दुबे यांना संसदेच्या लॉबीमध्ये गाठत त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रमध्ये राज्य सरकारने प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा सक्ती करण्याचा प्रयत्न केला. इयत्ता पहिली पासून हिंदी लादण्याचा निर्णय घेतला होता. त्याला महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला. या प्रकरणावर ठाकरे बंधूंनी एकत्रित येत आवाज उठवला. दोन दशकांनंतर मराठा अस्मितेसाठी एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खासदार निशिकांत दुबे यांनी निशाणा साधला होता. यावेळी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पटक पटक के मारेंगेची भाषा वापरली. त्यामुळे संतापलेल्या राज ठाकरेंनी दुबेंना डुबो डुबो के मारेंगेचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच महाराष्ट्रातील महिला खासदारांनी दुबेंना घेरलं आणि जाब विचारला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संसदेच्या सभागृहामध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्याने संसदेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले होते. यावेळी दक्षिण मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड, धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर या तिन्ही महिला खासदार लॉबीत आल्या. त्या निशिकांत दुबेंना शोधत होत्या. तिन्ही महिला खासदारांनी दुबेंना लॉबीत शोधलं आणि त्यांना घेरलं. त्यानंतर तिन्ही मराठी महिला खासदारांनी निशिकांत दुबेंवर प्रश्नांची लाखोली वाहिली. यावेळी मराठी खासदारांनी महाराष्ट्राचा ठसका निशिकांत दुबे यांना दाखवून दिला. त्याचबरोबर महाराष्ट्राचा अपमान कराल अशी वक्तव्ये करु नका असा इशारा देखील दिला. त्याचबरोबर जय महाराष्ट्रचे नारेही दिले. महिला खासदारांचा हा आवेश पाहून खासदार निशिकांत दुबे स्तब्ध उभे होते. अचानक महिला खासदारांनी आक्रमक पवित्र्यामुळे निशिकांत दुबे यांना काय करावे हेच सुचले नाही.
निशिकांत दुबेंनी घेतला काढता पाय
यावेळी संसदेच्या लॉबीमध्ये महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी खासदार निशिकांत दुबे यांना त्यांच्या वादग्रस्त विधानांबाबत जाब विचारला. महिला खासदार म्हणाल्या की, मराठी लोकांना मारण्याची भाषा तुम्ही कशी वापरू शकता? तुम्ही पटक पटक के कसं मारणार? आता आम्ही उभे आहे मारुन दाखवा. मराठी माणसा विरोधातील तुमची भाषा आम्ही खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा महिला खासदारांनी घेतला. महिला खासदारांनी दुबेंना घेरल्याचं कळल्यानंतर इतर खासदारही लॉबीत आले आणि त्यांनीही दुबेंना धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. यानंतर निशिकांत दुबे यांनी संसदेच्या लॉबीमधून काढता पाय घेतला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर कॉंग्रेस नेत्या व खासदार वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला आहे. दुबेंनी वादग्रस्त विधान केलं होतं, त्याचा जाब आम्ही त्यांना विचारला. आम्ही जाब विचारत असताना दुबे निघून गेले. त्यानंतर दुबे परत आले तेव्हा आम्ही जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. यावेळी लॉबीमध्ये जय महाराष्ट्राचा आवाज घुमला. त्यावर तुम्ही माझ्या बहिणी आहात असं हात जोडून दुबे म्हणाले आणि निघून गेले, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.