कणकवली : लोकसभा निवडणुकीनंतर आमदार नितेश राणे आपल्या वडिलांच्या पराभवाचा हिशोब घेऊन बसणार आहेत. यापूर्वी पराभवानंतर सुदन बांदिवडेकर यांची बोटे कोणी छाटली, बाळा वळंजू यांचा मृत्यू मुंबईत कसा झाला? याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावा, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार राहणार नाही, मते न मिळाल्यास विकास निधी देणार नाही, अशी सरपंचांना धमकी देणे ही नितेश राणेंची जुनीच परंपरा असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक बोलत होते. यावेळी कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, डॉ. प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक म्हणाले, राज्यात मविआचे सरकार होते, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी विकास निधीबाबत राजकारण करता कोणत्याही पक्षाचा सरपंच असला तरी त्याच्या गावासाठी विकासनिधी निधी उपलब्ध करुन दिला होता. आमदार नितेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नारायण राणेंना मते न मिळाल्यास गावचा विकास निधी रोखला जाईल, अशी धमकी सरपंचांना देत आहेत. धमकी देणे नितेश राणेंची जुनी परंपरा आहे. सुदन बांदिवडेकर यांची बोटे कोणी छाटली, बाळा वळंजू यांचा मुंबईत कसा मृत्यू झाला? हे भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही. त्यामुळे राणेंचा प्रचार करताना या दोन्ही घटनांची जाणीव ठेवावी, आपला जूना मित्र म्हणून भाजपला सावध सूचना करतो, अशी आठवण आमदार वैभव नाईक यांनी करुन दिली.
नारायण राणे व दीपक केसरकर यांच्यात सलगी वाढली आहे. त्यामुळे राजन तेलींना बाजूला टाकण्याचे काम पद्धतशिरपणे सुरु आहे. आता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तेलींना बाजूला टाकण्यात आले. त्यापद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकीत तेलींना बाजूला टाकले जाणार आहे. नारायण राणेंना देवेंद्र फडवणीस हे रस्त्यात भेटत होते. त्यावेळी त्यांनी राणेंना भाजपात प्रवेश करण्यास सांगितले. त्याच फडणवीस यांनी आता राणेंना रस्त्यावर आणले असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राणेंना तिकिट मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, विनायक राऊत यांच्या विरोधात महायुतीला उमेदवार मिळत नाही. त्यामुळे भाजप कोणाला तरी बळीचा बकरा बनवत आहे, अशी टीका श्री. नाईक यांनी केली.