कर्जत – बुधवारची सकाळी सिनेसृष्टीसाठी धक्कादायक व दु:खद ठरली. चित्रपटसृष्टीतील सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांनी बुधवारी पहाटे कर्जत येथील एन.डी. स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्या या धक्कादायक एक्झिटमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. खालापूर पोलिसांनी एन.डी. स्टुडिओतील नितीन देसाई यांचा मृतदेह खाली उतरवल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. यावेळी पोलिसांना नितीन देसाई यांच्या मृतदेहाजवळ एक व्हॉईस रेकॉर्डर मिळाला होता. कर्ज वसुलीचा तगादा लावणाऱ्या चार ते पाच अधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांच्या कामकाजावर आक्षेप नोंदविला आहे. दरम्यान, आज सायंकाळी 4 वाजता नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव एनडी स्टुडीओमध्ये अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
एनडी स्टुडिओमध्ये होणार अंत्यसंस्कार
जेजे रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईकांच्या विनंतीवरून मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मुलीसह कुटुंबातील काही सदस्य परदेशातून येणार आहेत. त्यांच्या आगमनानंतर पार्थिव कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात येणार आहे. एनडी स्टुडिओमध्येच त्याच्यावर अंत्यसंस्कार व्हावेत, अशी नितीनच्या नातेवाईकांची इच्छा आहे. रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी रात्री ही माहिती दिली.
शुक्रवार म्हणजे आज सायंकाळी ४ वाजता नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याआधी दुपरी १२ ते २ वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव एनडी स्टुडीओमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होणार – पवार
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ज्या क्लिप मिळाल्या आहेत, त्याचे सखोल विश्लेषण करण्यात येणार आहे. कायद्यातील नियमाप्रमाणे दोषींवर कारवाई होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हेसुद्धा उपस्थित होते.