चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत आपण काँग्रेसच्या वरिष्ठांशी या पूर्वी बोललो आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही वेळोवेळी चर्चा झाली होती. आपण प्रवेश करणार हे तीन महिने चर्चेत होते ते आज सत्यात उतरले. त्यात नवीन असे काहीच नाही कारण महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे येथे निवडणूक लढायची तर पक्षांतर करावेच लागणार होते. आपण काँग्रेस सोडली असली तरी ती एक अरिर्हता आहे. कारण काँग्रेस हा महाविकास 2 आघाडीचा घटक असल्याने आपल्या सोबत असणाऱ्या सर्वांनी पक्षांतर करावे असे मी कधीही म्हणणार नाही. कारण निवडणुकीत आम्हाल एकत्रच काम करायचे आहे. आता घड्याळ अचूक चालतेय, कोठेही अडचण नाही, अचूक टायमिंग साधतेय, स्थानिक नेते व वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये चांगला समन्वय आह. त्यामुळे कोणतीही ‘अडचण नाही, आपण लढणार आहोत असे राष्ट्रवादीत प्रवेश केलेले प्रशांत यादव यांनी सांगितले.
आपण गेले अनेक वर्षे काम करीत आहोत. मूळ काँग्रेस विचारधारेत असल्याने पूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो. परंतु २०१५ मध्ये राष्ट्रवादीने पंचायत समिती निवडणूकीत आपल्याला संधी दिली नाही व आपण अपक्ष रिंगणात उतरलो, आपल्याला निसटते अपयश आले मग आपण माजी आमदार व काँग्रेसचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष रमेशभाई कदम यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेलो. तेथे काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून काम करीत असताना आपल्याकडे जे जे लोक आले त्यांचे प्रश्न सोडविण्याचे, आवश्यक तेथे सहकार्य करण्याचे काम केले. आपल्यापरीने योगदान देत असताना पक्ष मात्र वाढत नसल्याचे वरिष्ठांना वेळोवेळी सांगितले. पण पुरसे लक्ष दिले गेले नाही. आता राजकीय स्थित्यंतरे घडली व शिवसेना, राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडली. त्यामुळे राजकीय गणिते बदलली आहेत. अशा वेळी आपण कुस बदलणे गरजेचे वाटले त्याशिवाय संधी मिळणार नव्हती म्हणून हा पक्षप्रवेशाचा घाट घातला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी आपल्याला संधी दिली व चिपळूण मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. येथील आमदार आपले मित्र आहेत, त्यांचे व आपले कौटुंबिक संबंध आहेत, ते कायम राहतील तरीही आता राजकीय भूमिका दोघांच्या वेगळ्या असतील आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर असून सर्वांना बरोबर घेऊन आपण ही लढाई लढणार आहोत असेही प्रशांत यादव यांनी सांगितले.
आता अधिक जोमाने ग्रामीण भागात काम करणार असून वरिष्ठांनी जिल्हाध्यक्ष व स्थानिक नेत्यांना एक मोठा मेळावा घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. आत आम्ही सर्व बसून त्याचे नियोजन करु. आपण आपल्यापरिने सर्वसामान्यांची कामे करीतच राहणार आहोत. आपल्याला या मतदार संघात बदल करायचा आहे, तरूणांसाठी काम करायचे आहे. रोजगाराभिमुख योजनांच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करून हा मतदार संघ बांधायचा आहे. पवार साहेबांना अभिप्रेत असणारे काम करताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व काँग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढे जायचे आहे, लोकांचा आशिर्वाद आणि प्रेम वेळोवेळी आपल्याला मिळत आहे व या पुढेही ते मिळेली कारण तीच आपली ताकद आहे असेही प्रशांत यादव यांनी यावेळी सांगितले.