आता वाहनांच्या गर्दीनुसार सिग्नल बदलणार रंग; 'इथं' सुरु झालीये चाचणी
संभाजीनगर : मुख्य रस्त्यावरील चौकात सुरू असलेले सिग्नल त्या मार्गावर वाढणाऱ्या वाहनाच्या संख्येनुसार स्वतः रेड राहण्याचे टायमिंग स्मार्ट यंत्रणा आधारे वाढवून घेणार आहे. ‘एआय’ यंत्रणेचा वापर करून स्मार्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे. याचा पहिला प्रयोग सेव्हन हिल, क्रांती चौकात होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.
स्मार्ट सिटीच्या कार्यालयात सीईओ तथा महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतलेल्या बैठकीनंतर बोलत होते. स्मार्ट सिटी म्हणून उभ्या राहत असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील सिग्नल यंत्रणा मात्र जुन्याच पद्धतीने काम करत आहे. चौकातील एका बाजूने वाहने नसतानाही, ग्रीन सिग्नल चालू असते. सेट केलेला टायमिंग संपल्यानंतरच रेड सिग्नल लागतो. त्यामुळे चौकाच्या दुसऱ्या बाजूस थांबलेल्या वाहनधारकांना गरज नसताना थांबावे लागते. रुग्णवाहिका सायरन वाजवत आल्यानंतर रेड सिग्नलमुळे वाहनधारक पुढे जाण्यास कचरतात.
वाहनांची गर्दी असतानाच, ग्रीन सिग्नलचा रेड होतो, त्यामुळे वाहनधारकांना पुन्हा थांबावे लागते. उन्हाळ्यात सिग्नलवर एक-दोन मिनिटे थांबावे, वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरते. शहरात सुमारे ४५-५० सिग्नल लावलेले आहेत. यातील जवळपास सर्वच सिग्नलवर टायमर लावण्यात आलेले असून यातील ५० टक्के सिग्नलवर टायमरचा वापरच होत नाही. तर सेट केलेला टाईम पूर्ण केल्यानंतरच ग्रीन यलो-रेड सिग्नलची सायकल पूर्ण होते.
जालना रोडवर तर एक ते दीड सेकंदाची वेळ सेट केलेली आहे. सेव्हन हिल चौकात तर तीन मिनिटे थांबावे लागते. याशिवाय स्मार्ट सिटीने शहरात ७०० कॅमेरे बसविलेले असून, हे कॅमेरे चौकातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात. चौकातून जाणाऱ्या वाहनांच्या गर्दीनुसार सिग्नलची वेळ आपोआपच कमी-जास्त व्हावी, अशी यंत्रणा स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांनी तयार केली आहे. ही यंत्रणा शहरात दोन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर वापरली जाणार असून, प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील मुख्य गर्दीच्या सिग्नलवर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
त्या नुसत्याच घोषणा…
शहरातील १४ ठिकाणी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिग्नल बसवण्यात आलेले आहे. हे सिग्नल बसविल्याने एका-एका चौकात सिग्नलचे तीन-तीन खांब झाले आहेत. मात्र, वाहनधारकांचा त्रास काही कमी झालेला नाही. एका चौकात सिग्नल ग्रीन लागल्यानंतर, पुढील चौकातही वाहनधारकांना ग्रीन सिग्नल मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र, या सगळ्या घोषणाच ठरल्या आहेत.