
फोटो सौजन्य - Social Media
सिल्लोड तालुक्यातील भवन येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये नुकताच एक भावनिक आणि आठवणींना उजाळा देणारा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. सन २०००-२००१ या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आणि शालेय जीवनातील गोड क्षणांना नव्याने उजाळा मिळाला. काळ लोटला, चेहरे बदलले; मात्र मैत्रीतील आपुलकी आणि गुरुजनांप्रतीचा आदर आजही तसाच कायम असल्याचे या स्नेहसोहळ्यातून प्रकर्षाने दिसून आले.
या स्नेहमेळाव्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी शिक्षक आणि मान्यवरांचे पुष्पहार, ऋषिवचरित्र तसेच ‘अराजकाच्या शांततेत’ हे पुस्तक देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. या सोहळ्याला शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी. बी. दौड, एन. पी. दौड, पी. जी. सुरडकर, शंकर फुले आदी गुरुजनांसह एकूण ४० माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शालेय जीवनातील खोडकर प्रसंग, वर्गातील हशा, एकत्र केलेला अभ्यास, मैदानावर खेळलेले खेळ, वार्षिक स्नेहसंमेलनातील आठवणी अशा अनेक आठवणींनी उपस्थितांचे मन भारावून गेले. आज विविध क्षेत्रांत स्थिरावलेले हे विद्यार्थी पुन्हा एकदा ‘विद्यार्थी’ बनून त्या दिवसांत हरवून गेले होते. अनेकांनी मनोगतातून शिक्षणासोबतच जीवनमूल्यांची शिकवण देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या स्नेहमेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून, विशेषतः व्हॉट्सॲप ग्रुपच्या सहाय्याने अवघ्या महिनाभरात या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र येत हा गेट-टुगेदर यशस्वीपणे पार पाडला. या कार्यक्रमात १८ विद्यार्थिनी आणि २२ विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन राधा गावंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळू कळम यांनी केले.
या स्नेहसोहळ्यात आणखी एक विशेष बाब ठरली. माजी विद्यार्थिनी नंदा देशमुख (शिक्षिका, नांदेड) यांच्या मुलीने सौम्या देशमुख यांनी लिहिलेले ‘अराजकाच्या शांततेत’ हे पुस्तक उपस्थितांना वाटप करण्यात आले. धावपळीच्या जीवनात सकारात्मक दृष्टी देणारे हे पुस्तक सर्वांना भावले. नंदा देशमुख आणि त्यांच्या मुलीच्या साहित्यिक योगदानाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले.
एकूणच हा स्नेहमेळावा नात्यांची ऊब जपणारा, आठवणींना उजाळा देणारा आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरला. शालेय मैत्रीची वीण किती घट्ट असते, याचा प्रत्यय या स्नेहसोहळ्यातून पुन्हा एकदा आला.