नागपूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तीव्र आंदोलन व उपोषण केले. राज्य सरकारने अध्यादेश (Reservation GR) काढत मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे सांगितले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्युस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले असल्याची चर्चा सर्वत्र आहे. दरम्यान, यावर ओबीसी (OBC) महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taiwade) यांनी मराठा आरक्षणावर मत व्यक्त केले आहे.
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर ओबीसी समाज मुंबईमध्ये आंदोलन उभे करले असा इशारा दिला होता. आता मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर डॉ. तायवाडे म्हणाले, “आंदोलकांना वाटत असेल की, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांना समाधान वाटत असेल, तर त्यांचं आणि सरकारनं मार्ग काढला असेल तर सरकारच मी अभिनंदन करतो.”
पुढे ते म्हणाले, “सगेसोयाऱ्यांच्या व्याख्येबद्दल बोलल्या जात होत. वडील, आजोबा आणि पंजोबा यांच्या महसुली व शैक्षणिक कागदपत्रावर जी जात लिहिली असेल, ते त्यांच्या मुलांना व नातवंडांना लागू होते आणि तेच सरकारने दिलेल्या राजपत्रात लागू होते. त्यामुळे सरकारने नवीन काही दिलेल नाही म्हणून ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागला नाही. आता मराठा समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल की, आपल्याला काय मिळालं. आम्हाला कोणताही धोका नाही.” असे मत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.