पुणे: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जरांगे उपोषणाला बसताच ओबीसी मुंबईकडे प्रयाण करतील, असा इशारा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको यासाठी लढत असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बुधवारी पुणे येथे प्रत्रकार परिषदेत दिला.
ओबीसी आरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिंदे समितीचा अहवाल खुला झाला आहे. त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी भांडणाऱ्यांनी तब्बल ८ लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा केला आहे. असे असेल तर ओबीसी आरक्षण संपल्यातच जमा आहे, अशी टीका करतानाच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट खुलासा करावा अशी मागणीही हाके यांनी यावेळी केली.
मराठा समाजाच्या ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि ८,२५००० पेक्षा जास्त ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे, असा दावा एका वृत्तात करण्यात अला आहे. त्यानुसार शिंदे समितीने दिलेला अहवाल जर महाराष्ट्र सरकारने स्विकारला तर ओबीसींचे आरक्षण संपले म्हणून समजा. मूळ ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असे आमचे म्हणणे आहे.
मात्र सरकार तेच करायला निघाले अहे. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम आहे, त्यामुळे ओबीसी प्रवर्गात त्यांना सामावून घेतल्यास ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि ओबीसी समाजातील ज्या जाती आधिच मागास आहेत त्या मागासच राहतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार!
मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी त्यांनी दीड वर्षे याच मुद्द्यावरुन रान पेटवले होते. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसह सर्वव्यापी आंदोलन उभे केले. आता पुन्हा एकदा राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आंदोलनासाठी नवीन तारीख दिली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे जालनातील अंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहे. आरक्षणाच्या आंदोलनाबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. तसेच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येणार आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच येत नाही. आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. “