मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यापूर्वी लक्ष्मण हाके यांची टीका
पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे उद्यापासून मराठवाड्यामध्ये दौरे सुरु होणार आहेत. त्यामुळे मराठा बांधवांची जोरदार तयारी देखील सुरु आहे. सगेसोयरे शब्दासह सरसकट आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. उद्यापासून जरांगे पाटील यांचा दौरा सुरु होण्यापूर्वी ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके यांनी खोचक टोला लगावला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा असा उपहासात्मक टोला लक्ष्मण हाके यांना लगावला आहे.
अशांतता निर्माण करायची अने शांतता रॅली काढायची
माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, या महाराष्ट्रामध्ये अशांतता कोणी निर्माण केली आहे, बीडमधील जाळपोळ, भगवान गडावर दगडफेक करण्याचा प्रयत्न कोणी केला ? एका बाजूला अशांतता निर्माण करायची आणि पुन्हा तेच शांतता रॅली काढणार या काय म्हणायचे, याचे उत्तर जरांगे यांनीच द्यायला हवे. कायदा व सु्व्यवस्था या महाराष्ट्रात आहे मात्र जेव्हापासून महाराष्ट्रात जरांगे पाटील यांची आंदोलने सुरु झाली तेव्हापासून त्यांचा एकच कार्यक्रम आहे की भुजबळांना बदनाम करणे. भुजबळ कसे खलनायक आहेत अशा पद्धतीचे वातावरण त्यांनी निर्माण केले आहे, अशी घणाघाती टीका लक्ष्मण हाके यांनी केली. तसेच जरांगे पाटील हे त्यांचे आंदोलन संपेपर्यंत टिका करतच राहणार असा एल्गार देखील लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे.
जरांगे पाटलांना पाडापाडीच्या शुभेच्छा
मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले त्याचप्रमाणे ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी लक्ष्मम हाके यांनी उपोषण केले. जरांगे पाटील यांचा दौरा उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची पुढची भूमिक काय असेल या संदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “येत्या रविवारी छ.संभाजीनगरमध्ये बैठक होत आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक विभागामध्ये आम्ही संवाद दौरा घेऊन जाणार आहोत. आपल्या हक्क, अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील बांधवाला आवाहन करणार आहोत. ओबीसी आरक्षण म्हणजे काय, परिस्थिती एकंदरीत काय आहे याबाबत माहिती देणार. महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील लोकांनी एकत्र येत आपल्या न्याय, हक्कासाठी लढाई उभी केली पाहिजे. या महाराष्ट्रात जरांगे पाटील कोणाचे आमदार पाडणार आहे त्याचा ओबीसींवर काहीही परिणाम होणार नाही त्यामुळे जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा आहेत. धनगर समाजाच्या नादाला लागलो तर गावगाड्याच्या मनगटाला मनगट लावण्याची ताकद फक्त धनगर समाजात आहे हे जरांगेंना चांगलेच माहित आहे. जरांगे पाटील यांनी धनगर समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका. सगळे नेते ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे यासाठी आमच्या सर्व नेत्यांचे एकमत आहे,” अशी स्पष्ट भूमिका लक्ष्मण हाके यांनी मांडली आहे.