मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक
ओबीसी नेते हाके यांनी फाडला आरक्षणाचा जीआर
ओबीसी नेते राज्यभर आंदोलन करणार
Lakshman Hake On Maratha Reservation: काल महराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी सोडले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने अर्थात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र आता हा जीआर काढल्यावर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत.
राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र आता सरकारच्या जीआरविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते या निर्णयाविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन करण्याची शक्यता आहे. दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचा जीआर फाडला असल्याचे समजते आहे.
सरकारने काढलेल्या जीआरनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात मराठा आरक्षणचा जीआर फाडला आहे. हा निर्णय संविधानविरोधी असल्याचे हाके म्हणाले.
काय म्हणाले ओबीसी अध्यक्ष?
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवर प्रतिक्रिया दिली आहे. बबनराव तायवाडे म्हणाले की, जो शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्या निर्णयाचा आम्ही अभ्यास केला, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. या काढलेल्या GR मध्ये जे सांगण्यात आले आहे, त्यावरून आमचे समाधान आहे. ओबीसी समाजाचे नुकसान झालेले नाही. आतापर्यंत प्रचलित असलेल्या पद्धतीनुसारच जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद या GR मध्ये आहे. आम्ही आज कायदे तज्ञांशी चर्चा करू.. त्यानंतर आम्ही आमच्या आंदोलन आणि साखळी उपोषण बद्दल अंतिम निर्णय घेऊ, असे मत बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष म्हणाले की, “राज्य सरकारकडे आमच्या अनेक मागण्या होत्या. त्याबद्दल सरकारने आमच्याशी चर्चा करावी. त्या मागण्यांबद्दल आमचे समाधान करावं. सध्या तरी आम्हाला वडिलांकडचे नातेसंबंध असेच सरकारने म्हटले आहे असेच GR वरून दिसतो. सरसकट म्हटलेले नाही,” असे देखील स्पष्ट मत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मांडले आहे.