
कराडमधील महामार्ग ठरतोय अपघातांचा सापळा; आतापर्यंत 100 पेक्षा जास्त अपघात, 54 जणांचा मृत्यू
कराड : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील कराड परिसरातील रखडलेल्या सहापदरीकरणाच्या कामाचा मुद्दा विधानसभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. कराडमधील अर्धवट उड्डाणपुलामुळे महामार्ग अक्षरशः अपघातांचा सापळा ठरत असून, आतापर्यंत १०० हून अधिक अपघातांत ५४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
आमदार डॉ. भोसले म्हणाले, पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र कराड येथील पंकज हॉटेलपासून नांदलापूरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पुलाचे काम अर्धवट असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या ठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत.
हेदेखील वाचा : पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?
महामार्गावरील असुरक्षिततेचे वास्तव अधोरेखित करताना त्यांनी नुकत्याच घडलेल्या एका भीषण अपघाताचा उल्लेख केला. पिंपळगाव येथील एका महाविद्यालयाची बस सहलीसाठी कणकवलीला गेली होती. परतीच्या प्रवासात कराड तालुक्यातील वाठार गावाजवळ बसचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कृष्णा हॉस्पिटलची संपूर्ण वैद्यकीय टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली. बसमधील ४० विद्यार्थ्यांपैकी ६ जणांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले, तर २ विद्यार्थ्यांची प्रकृती अतिगंभीर होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली; मात्र महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला, असे त्यांनी नमूद केले.
पुलाची नेमकी डेडलाईन काय?
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना थेट प्रश्न उपस्थित करताना आमदार डॉ. भोसले यांनी, या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची नेमकी डेडलाईन काय आहे? यापूर्वी ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आजही पुलाचे काम अपूर्ण असून, ८३ टक्के काम पूर्ण झाल्याचे जरी सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात साईटवर कामगार आणि प्रोजेक्ट इन्चार्ज उपलब्ध नाहीत. तसेच सर्विस रोडची दुरवस्था झाल्यानेही मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे स्पष्ट केले.
यासोबतच, वारंवार सूचना देऊनही कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) मार्फत काय कारवाई केली जाणार, याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस होणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर
यावर उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुरू असून, सध्या ते प्रगतीपथावर आहे. काही ठेकेदारांकडून दिरंगाई झाल्याचे मान्य करत, या संदर्भात केंद्र सरकारशी आधीच पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगितले.