संग्रहित फोटो
हा कार्यक्रम मुख्य रस्त्यावर ठेवण्यात आल्याने हडपसर तसेच काळेपडळ आणि कोंढवा भागातील नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागला. पोलिसांना वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास जवळपास दोन तास लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रम बंद करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात सध्या निवडणूकीचे वारे वाहत आहे. अनेक इच्छुकांकडून आपआपल्या प्रभागात असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. प्रभाक क्रमांक ४१ मध्ये देखील काही इच्छुक कार्यकर्त्यांनी इंदुरीकर यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. शुक्रवारी हा कार्यक्रम काळेपडळमधील श्रीराम चौकात ठेवण्यात आला होता. येथील रस्ता ६० फुटी आहे. येथून सायंकाळी मोठी वाहतूक असते. पण, हा कार्यक्रम थेट रस्त्यावरच स्टेज टाकून ठेवण्यात आला होता. दरम्यान, या कार्यक्रमाची कोणतीही परवानगी देखील घेण्यात आली नव्हती, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोठी गर्दी झाली. नागरिक रस्त्यावर खुर्च्या टाकून बसले. पाहता-पाहता प्रचंड गर्दी झाली अन् रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
साडे पाचपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल सुरू झाले. सय्यदनगर, ससाणेनगर, गाडीतळ तसेच हडपसरमधून नागरिक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे काही वेळातच दोन ते तीन किलोमिटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यात शाळा सुटण्याची वेळ असल्याने स्कूल व्हॅन देखील यात अडकून पडल्या. त्यामुळे पालक व नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. नंतर काळेपडळ वाहतूक विभागाने याठिकाणी धाव घेतली. तेव्हा कोंडी पाहून अधिकारीही हवालदिल झाले.
रस्ता रिकामा करण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही बाजूला होईना. त्यामुळे वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण जाधव यांनी थेट विनंतीपुर्वक हा कार्यक्रम बंद करण्यास सांगितले. त्यांना काही प्रमाणात विरोध झाला. पण अधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडी प्रचंड झाली आहे, नागरिकांचे हाल होत आहेत, असे सांगत कार्यक्रम काही वेळ बंद केला. माईकवरूनच विनंती करत नागरिकांना एक लेन रिकामी करण्याची विनंती केली. लेन रिकामी झाल्यानंतर वाहतूक सुरूळीत करण्यास सुरूवात झाली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन तास लागले, तेव्हा वाहतूक सुरळीत झाली, असे जाधव यांनी सांगितले.






