गोसेच्या कालव्यात तरुणाचा मृत्यू
शिरोळ : देवदर्शनासाठी गेलेल्या एका 38 वर्षीय व्यक्तीचा कुटुंबीयांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला. उन्हाचा पारा वाढत असल्याने या व्यक्तीने नदीत उतरून पोहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा आंघोळीसाठी पाण्यात उतरला. पण पाण्याचा अंदाज न आल्याने संबंधित व्यक्ती पाण्यात बुडाला. कुटुंबाच्या डोळ्यादेखत त्याला मृत्यूने गाठले. या प्रकाराने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
नरेंद्र अप्पासाहेब माने असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरेंद्र हा कुरुंदवाडच्या कोरवी गल्लीत वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी नरेंद्र आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी याठिकाणी देवदर्शनासाठी गेला होता. देवाचं दर्शन घेतल्यानंतर हे कुटुंब विश्रांतीसाठी काही वेळ नदीच्या किनारी थांबलं होतं. यावेळी उन्हाचा कडाका वाढत असल्याने नरेंद्र हा नदीत उतरला होता. आंघोळीसाठी पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने नरेंद्र हा पाण्यात बुडाला.
दरम्यान, नरेंद्र याच्या कुटुंबीयांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी तातडीने आरडाओरडा केली. या कुटुंबियांची मदतीसाठी आरडाओरड सुरु होती. स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकालाही याबाबतची माहिती देण्यात आली. काही वेळात बचाव पथकही घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी तातडीने शोधमोहीम राबवत तासाभरात नरेंद्र माने याला पाण्यातून बाहेर काढलं. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
पाण्यातून बाहेर काढलं पण…
नरेंद्र माने हा पाण्यात बुडाल्याचे समजल्यानंतर त्याला पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जेव्हा त्याला पाण्यातून बाहेर काढलं असता त्याच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती. त्याच्या नाका-तोंडात पाणी गेलं होतं. घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह
नरेंद्र माने हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होता. त्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरोळ पोलिसांकडून सुरू आहे.