पालिकेच्या 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी
गोंदिया : एका खासगी शाळेत हजारावर विद्यार्थी पटसंख्या असताना नगर परिषदेच्या शाळांना मात्र घरघर लागली आहे. नगर परिषदेच्या 14 प्राथमिक शाळांमध्ये फक्त 695 विद्यार्थी असून, त्यातही कित्येक शाळांमध्ये तर बोटांवर मोजण्याइतकेच विद्यार्थी असल्याची आश्चर्यजनक बाब आहे. यावरून नगर परिषद शाळांची काय अवस्था झाली आहे, यावर प्रशासन व नगरसेवकांनी मंथन करण्याची गरज आहे.
एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा अधिकार अमलात आणला आहे. याशिवाय, गरीब पालकांवर विद्यार्थ्यांच्या कार्यालय नगर परिषद गोंदिया शिक्षणाचा बोजा पडू नये, यासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासह गणवेश, पाठ्यपुस्तक, जोडे-मोजे, पोषण आहार यासह अन्य शैक्षणिक साहित्य व सुविधा पुरवल्या जात आहेत; मात्र यानंतरही शासकीय शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कल कमी झाल्याची वास्तविकता आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये आता नवनवे उपक्रम राबवले जात असल्याने जिल्हा परिषद व शाळांकडे विद्यार्थी पालकांचा कल वाढत असल्याची वास्तविकता नाकारता येत नाही. ३११ पटसंख्या नगर परिषदेच्या हिंदी शाळांमध्ये आहे. मात्र, नगर परिषद शाळांना लागलेली पटसंख्या घसरणीची घरघर काही संपता संपेना, अशी स्थिती आहे.
आजही मुलींची संख्या मुलांपेक्षा कमीच
नगर परिषदेच्या १४ प्राथमिक शाळांमध्ये एकूण ६९५ विद्यार्थी असतानाच त्यात मुलांची संख्या जास्त असून, मुलींची संख्या कमी दिसून येत आहे. मराठी शाळांमध्ये एकूण ३८४ विद्यार्थी पटसंख्या असून, त्यात १९४ मुले व १९० मुली आहेत. तर हिंदी शाळांमध्ये ३११ पटसंख्या असून, त्यात १७२ मुले व १३९ मुलींची पटसंख्या आहे. जिल्हा परिषद शाळाही अशाच ओस पडू लागल्या होत्या; मात्र शाळेतील शिक्षकांकडून करण्यात आलेले प्रयत्न व राबविण्यात येत असलेले नवनवे उपक्रम आता जिल्हा परिषद शाळांची कात टाकणारे ठरत आहे.
जिल्हा परिषद शाळांकडे वाढू लागला कल
जिल्हा परिषद शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला आहे. यामुळे आता शाळांमधील पटसंख्या वाढू लागली आहे. तर दुसरीकडे नगर परिषद शाळा याबाबत उदासीन असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशात शिक्षकांनीही जबाबदारी स्वीकारून प्रयत्न केल्यास फलित मिळणार, यात शंका नाही.
शाळांना लागली घरघर
नगर परिषदेच्या शहरात एकूण १४ प्राथमिक शाळा असून, यामध्ये आठ मराठी तर सहा हिंदी शाळा आहेत. या सर्व १४ शाळांमध्ये यंदा एकूण ६९५ विद्यार्थी पटसंख्या आहे. यात मराठी शाळेची एकूण पटसंख्या ३८४ तर हिंदी शाळांची एकूण पटसंख्या ३११ एवढी आहे. त्यातही काही शाळांमध्ये तर बोटावर मोजावे एवढेच विद्यार्थी असल्याचे दिसून येत आहे. यावरून नगर परिषद शाळांची घरघर दिसून येत आहे.