लेखाजोखा कार्यअहवाल प्रकाशन करीत खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. ही लढाई शिवसेना किंवा विनायक राऊत यांची नाही तर मोदी यांच्या विरोधात आहे. आमच्यातून फुटलेल्या गद्दार लोकांविरुद्ध आहे. भाजपाला सर्व पक्ष फोडून आपलाच पक्ष ठेवायचा आहे. जरी जिल्ह्यात आमचा शिवसेना पक्ष मोठा भाऊ असला तरी आज आमच्या पक्षापेक्षा आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी आहे. म्हणजेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. उद्या भाजपाच्या तिकीटावर किरण सामंत लढतील, हे विश्वासाने सांगतो. त्यामुळे आमच्यावर फरक पडणार नाही, विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात महाविकास आघाडीची बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. विनायक राऊत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाळा गावडे, सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जान्हवी सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत, अतुल रावराणे, संग्राम प्रभुगावकर, भाई गोवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, रेवती राणे, अर्चना घारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, नागेश मोरये, सायली पाटकर, नितिषा नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक म्हणाले, आता आमच्याकडे पैसे नाहीत, ज्यांच्याकडे होते, ते सोडून गेले आहेत. मराठा समाज नेते मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलण्यासाठी सभागृहात फडणवीस यांनी अनेकांना उठवले. त्यांची चौकशी लावली. जिल्ह्यात जुने भाजपा नेते कुठे आहेत? कालच्या कणकवली येथील नमो रोजगारमध्ये आम्ही गेलो तर दुपारी चारच लोक होते. प्रत्येक गोष्टीत भाजपाने जनतेसमोर जुमला केला आहे. तुमची लढाई आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांसोबत आहे, तुम्ही मोदी किंवा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना आणा काहीही परिणाम होणार नाही. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
शिवसेना विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, मोदींची गॅरंटी म्हणजे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची गॅरंटी आहे. उपजिल्हा रुग्णालयातून रुग्ण जिल्हा रूग्णालयात तर तेथून बांबुळीला अशी ही गॅरंटी आहे. आयुष्यमान योजनेतून ५ लाख रुपये किंमतीचे औषध उपचार झाले का? अशी एक तरी व्यक्ती दाखवा. त्या व्यक्तीचा आम्ही सन्मान करू असे सतीश सावंत म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रश्न मोदींनी सोडवले नाही. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम मोदींनी केले. राऊतांच्या विजयाने आपला सन्मान वाढणार आहे. राऊत यांच्यावर भ्रष्ट्राचार केल्याचा एकही आरोप नाही. इतरांनी आपले हित जोपासले मात्र राऊत यांनी जनतेचे हित जोपासले असे सतीश सावंत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग उपाध्यक्ष अर्चना परब घारे म्हणाल्या, खासदार विनायक राऊत यांनी खऱ्या अर्थाने गेल्या १० वर्षात मतदार संघाचा विकास केला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष पुर्ण ताकदीनिशी राऊत यांच्या विजयासाठी काम करेल असे त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांना हमी भाव नाही, शेतकऱ्यांना जगणं कठीण करून ठेवलं, असे हे केंद्र आणि राज्य सरकार आहे. त्यामूळे आम्ही निष्ठेने काम करु आणि विनायक राऊत यांना विजयी करणार असे त्या म्हणाल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले, धनशक्ती समोर आमची लढाई आहे, तरीही लोक खासदार राऊत यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे विनायक राऊत यांचा विजय निश्चित आहे. असे सांगताना ते म्हणाले, माणगाव खोऱ्यात हत्ती हटाव मोहीम राबविण्यात आली, त्यामुळे लोक भयमुक्त झाले. आम्ही हे भयमुक्त लोक भाजपला पराभूत करतील.
अतुल रावराणे म्हणाले, राणेंनी फक्त आपले व्यवसाय उभारले आहेत, मतदार संघाचा विकास करू शकले नाहीत .संविधान वाचविण्यासाठी आपण विनायक राऊत यांच्या पाठीशी राहिले पाहिजे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, आम्ही घरातून गद्दारी अनुभवली आहे, प्रत्येक घराघरापर्यंत पोहचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विण्यक राऊत यांच्या पाठीशी आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, प्रत्येक समाज असुरक्षित आहे. आपल्या खासदारांची ओळख ही सर्वसामान्य लोकांचा खासदार म्हणून आहे. गेल्या १० वर्षात विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी काम केले. राणे भाजप स्वतःला मालक समजत आहे, त्यांना जागा दाखवा असे ते म्हणाले.