
कुडाळ-पाचगणी मार्गावर झुडपांचे साम्राज्य; बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत नसल्याची वाहनचालकांची तक्रार
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र पावसाळा संपूनही ही झुडपे हटविण्याकडे जावळी बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम विभागाचा शाखा अभियंता किंवा संबंधित कर्मचारी फिरकला देखील नसल्याने रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कशी येणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कुडाळ-पाचगणी मार्गाचा पुणे-मुंबईसह विविध भागांतून पाचगणी, महाबळेश्वरकडे जाणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या मार्गावर कायमच वाहनांची वर्दळ राहते. अशा परिस्थितीत रस्त्यावर आलेली झुडपे वाहनचालकांच्या दृष्टीस अडथळा ठरत असल्याने समोरून येणारे वाहन अचानक दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे.
उपअभियंत्यांचा सातारा कार्यालयातूनच जावळीचा कारभार?
जावळी बांधकाम विभागाचे नव्याने रुजू झालेले तरुण नव्या दमाचे उपअभियंता पवार हे मेढा कार्यालयात कमी आणि सातारा येथील मुख्य कार्यालयात अधिक वेळ देत असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत संबंधित शाखा अभियंताही सातारा कार्यालयातच घुटमळताना पहायला मिळतात. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची प्रत्यक्ष परिस्थिती अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्यांची पाहणी करून वेळोवेळी रस्त्याकडील झुडपे हटविणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या छाटणे आणि वाहनचालकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे ही बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. मात्र, सध्या जावळी तालुक्यातील अनेक प्रमुख मार्गांवर याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.
तालुक्यातील या राज्यमार्गांवरही झुडपांचा विळखा
@सायगाव-दरेखुर्द-वाघेश्वर,
@वेण्णा पूल ते कुसूंबी-वेळेकामठी
@कुडाळ-हुमगाव ते पाचगणी
मोठ्या प्रमाणात झुडपे रस्त्यावर
या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात झुडपे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे या मार्गांवरील वाहतुकीला धोका निर्माण झाला असून, अपघात घडण्यापूर्वीच बांधकाम विभागाने तातडीने झुडपे हटवावीत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांमधून होत आहे.
अपघाताची वाट पाहू नका
रस्त्यावर आलेली झुडपे तातडीने हटविण्यात आली नाहीत तर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.