गूढ आवाजाने पुन्हा एकदा पैठण हादरले; तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
पैठण : नाथसागरातून तब्बल 3 लाख 6 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नंतर अवघ्या काही तासांतच पैठण शहर व परिसरात जमिनीतून बॉम्बस्फोटासारखा गूढ आवाज घुमला आणि सौम्य धक्का बसला. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गूढ आवाजानंतर शहरात चर्चेला उधाण आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २:४५ च्या सुमारास नेहरू चौक, दारुसलाम मोहल्ला, सादात मोहल्ला, नाथ गल्ली, नारळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर तसेच वडवाडी, आपेगाव, हिरडपुरी, पिंपळवाडी, एमआयडीसी या भागात इतकेच नव्हे तर पैठण पोलिस घरांची दारे-खिडक्या थरथरल्या. ठाण्याच्या खिडक्याही हालल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुरक्षा यंत्रणांनाही हादरे बसल्याने नागरिकांची भीती आणखी वाढली आहे. नाथसागर विसर्गानंतर वारंवार घडणारे गूढ आवाज व धक्के यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी अधिकृत नोंदी नसल्याने परिस्थिती अजून गूढच आहे. प्रशासनाने यावर तातडीने वैज्ञानिक तपासणी करून नागरिकांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.
नाथसागरातून झालेल्या प्रचंड विसर्गामुळेच हा गूढ आवाज आणि सौम्य धक्का बसला का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. वयोवृद्धांनी आठवण करून दिली की, १९९०, १९९९ आणि २००६ मध्ये मोठा विसर्ग झाल्यानंतरही अशाच घटना घडल्या होत्या. त्यानंतर २०१९ व २०२२ सालीही पैठण शहरात जमिनीतून बॉम्बस्फोटासारखे गूढ आवाजाच्या घटना नोंदल्या गेल्या होत्या. पाच वर्षांपूर्वी भूगर्भशास्त्रज्ञांनी मौजे वडवळी येथून मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले. मात्र, त्याचा अहवाल अद्याप जाहीर झाला नसल्याची माहितीही समोर आली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका : तहसीलदार
या घटनेबाबत तहसीलदार ज्योती पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जमिनीतून गूढ आवाज व सौम्य धक्का जाणवल्याची माहिती मिळताच नाशिक येथील संस्थेशी संपर्क केला. मात्र, त्या ठिकाणी जमिनीला हादरे बसल्याची कोणतीही नोंद झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
नाथसागर धरणावरील भूकंपमापक यंत्र बंद
नाथसागर धरणावरील भूकंप मापन यंत्र गेली सात वर्षे बंद असून, दुरुस्तीला नाशिकला पाठवलेले हे यंत्र अद्याप कार्यरत झालेले नाही. त्यामुळे जमिनीत होणाऱ्या हालचालींची कोणतीही अधिकृत नोंद होत नाही. धरण प्रशासनाची ही बेफिकिनरी धोकादायक ठरू शकते, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.