India-Pakistan War
पंढरपूर : भारत- पाकिस्तान सिमेवर सुरू असलेल्या धुमशचक्रीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, पोलिसांनीही पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील सर्व संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. रेल्वे स्थानक, बस स्थानक, मंदिर परिसर, तालुक्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळे व महत्त्वाच्या प्रशासकीय इमारती अशा अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक पोलिस, विशेष पोलिस दले, निमलष्करी दलातील जवान, या ठिकाणी पहारे देत आहेत. रेल्वे पोलिसांनीही सर्वच स्थानकांवर सुरक्षा कडक केली असून, स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसह प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे.
युध्दस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, जिल्हयातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी सूचना केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने नागरिकांमध्ये जनजागृती करून, अफवांना आळा घालावा, चुकीच्या माहितीचे त्वरित खंडन करावे, असे या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानक, पंढरपूर विभागात सुरक्षा वाढवली
भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर विभागात व्यापक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. पंढरपूर रेल्वे स्टेशन व मंदिर परिसर हे संवेदनशील ठिकाण म्हणून ओळखले जाते. पंढरपूर रेल्वे स्टेशन व मंदिर परिसरात अतिरिक्त निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांकडून (जीओ) नियमित अचानक तपासणी केली जात आहे आणि सीसीटीव्ही फुटेजचे सतत निरीक्षण केले जात आहे.
पंढरपूर पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ जागृत
पोलिसांनी शहर आणि तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली असून, शहरात प्रखर प्रकाश झोत (बीम लाईट, लेझर बीम लाईट) सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पंढरपूर शहरात पंढरपूर पोलिस, जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आदी यंत्रणांचा सहभाग असलेले ‘मॉकड्रील’ शहरात पार पडले. पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातील गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक, तसेच मॉल, चित्रपटगृहांच्या परिसरात देखील संभाव्य व आपत्कलिन परिस्थितीला सामोरे कसे जायचे, याची प्रात्यक्षिके सादर केली. गुरुवारी रात्रीपासूनच शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संस्थांच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरीकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.