खाली गाद्या टाकून रुग्णांवर उपचार
अमरावती : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. या बदलत्या वातावरणामुळे अनेक आजारही बळावत आहेत. असे असताना अमरावती जिल्ह्यातील हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे साथीच्या आजारांनी कहर केला आहे. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून, डेंग्यू व चिकनगुनियानेही डोके वर काढले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची एवढी गर्दी झाली की, एका खाटेवर 2 रुग्ण ठेवण्याची वेळ आली. परिस्थितीचा सामना करताना रुग्णालय प्रशासनाने काही रुग्णांना इतर वॉर्डात हलवून तात्पुरती सोय केली. दररोज 60 ते 70 रुग्ण व्हायरल फिव्हरसाठी ओपीडीमध्ये येत असून, ग्रामीण भागातही रुग्णसंख्या लक्षणीय आहे. गेल्या 6 महिन्यांत जिल्ह्यात 52 डेंग्यूचे रुग्ण आढळले तर चिकनगुनियाचेही 43 रुग्ण नोंदवले गेले.
सध्या व्हायरल इन्फेक्शनने जिल्ह्यात कहर केला असून, डास, कीटकांपासून तसेच पाण्यापासून होणाऱ्या साथरोगांनी चांगलेच हातपाय पसरले आहेत. खासगी क्लिनिक, हॉस्पिटल्समध्ये विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली असून, जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांसह नातेवाइकांच्या रांगा लागल्या आहेत.
खाट एक अन् उपचार दोन रुग्णांवर…
जिल्हा सामान्य रुग्णालयात एका खाटेवर 2 रुग्ण ठेवण्याची वेळ आली होती. परंतु, रुग्णालय प्रशासनाने काहींना खाली गादी टाकून तर काहींची अस्थिरोगासारख्या वॉर्डात जेथे रुणांची संख्या कमी आहे, तेथे सोय केल्यामुळे रुग्णांची तात्पुरती सोय झाली आहे.
रुग्णांची वाढतीये संख्या
गेल्या 15 दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. ओपीडीमध्ये दररोज 60 ते 70 रुग्ण सर्दी, खोकला, तापाचे येत आहेत. तसेच जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यात 6 महिन्यात डेंग्यू आजाराचे 52 रुग्ण आढळून आले. अशात जानेवारी ते जूनदरम्यान जिल्ह्यात डेंग्यू संशयितांचे 661 नमुने घेण्यात आले. त्यांपैकी तपासणीअंती 52 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यात ग्रामीण क्षेत्रात 479 नमुने घेतले. त्यात 35 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले.