
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Jalgaon News: धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडण्याबाबत प्रशासनाकडून निर्णय घेतला जात नसल्याने साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी पिंपळनेर येथील सामोडे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे चौफुलीच्या चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने साक्री तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Jalgaon News:
खरीप हंगामाला फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर आहेत. गहू, हरभरा, कांदा यांसह अन्य पिकांच्या लागवडीसाठी तसेच उभ्या पिकांना वाचविण्यासाठी पाण्याची गरज आहे. मात्र, लाटीपाडा धरणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
लाटीपाडा धरणातून पाणी सोडण्याचा अधिकृत लेखी आदेश द्यावा, आवर्तनाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे आणि शेतीपंपांचा खंडित वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाव्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले, केवळ तोंडी आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कार्यवाही हवी, अशी भूमिका शेतक-यांनी घेतली.
यापूर्वी लाटीपाडा धरणातून दरवर्षी चार आवर्तने दिल्यानंतरही पाणीसाठा शिल्लक राहत होता. मग यंदा रब्बीसाठी पाणी सोडण्यास टाळाटाळ का, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, आंदोलन सुरू असताना शेतकरी दत्तात्रय शंकर दाभाडे यांना अचानक चक्कर आल्याने ते घटनास्थळी कोसळले. उपस्थितांनी तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रसाद रौदळ, पीएसआय मोरे आणि पोलीस पथकाने बंदोबस्त ठेवला होता. पाण्याबाबत तातडीने लेखी निर्णय घेऊन प्रत्यक्ष आवर्तन सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे.
Ans: लाटीपाडा धरणात पाणीसाठा असूनही रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
Ans: पिंपळनेर येथील सामोडे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Ans: धरणातून पाणी सोडण्याचा लेखी आदेश, आवर्तनाचे निश्चित वेळापत्रक आणि शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.