पिंपरी: ह्युमन मेटान्यूमो (एचएमपीव्ही) या विषाणूचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आराेग्य वैद्यकीय विभागाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचएमपीव्ही विषाणूबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. एचएमपीव्ही विषाणूच्या अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, भीतीचे वातावरण निर्माण करू नये. तसेच सर्दी, खाेकला, ताप ही लक्षणे आढळल्यास नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
खोकला किंवा शिंका येत असताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. साबण, सॅनिटायझरने हात वारंवार धुवावेत. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे. भरपूर पाणी प्यावे. पौष्टिक खावे, संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. दररोज स्वच्छ रुमाल वापरावा. हस्तांदोलन, टिश्यू पेपरचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी धुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
आठ रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकता पडल्यास खाटांची संख्या वाढविण्यात येईल. गरज लागल्यास एक रुग्णालय एचएमपीव्हीसाठी राखीव ठेवण्यात येईल. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची नोंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आराेग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी असल्यामुळे विविध ठिकाणाहून नागरिक सातत्याने कामानिमित्ताने ये-जा करतात. त्यामुळे शहरात कटाक्षाने खबरदारी घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव
भारतात HMPV म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागपूरमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत सात जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने सांगितले आहे की या प्रकरणांमध्ये वाढ झाली तरी कोविडसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. बेंगळुरू, नागपूर, आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन, तर अहमदाबादमध्ये एक रुग्ण नोंदवला गेला आहे.
हेही वाचा: HMPV Virus in Maharashtra: महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव; नागपुरात दोन रूग्णांची नोंद
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे स्पष्टीकरण
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी व्हिडिओद्वारे माहिती दिली की, HMPV हा नवीन विषाणू नाही. 2001 साली या विषाणूची प्रथम ओळख झाली आणि त्यानंतर तो संपूर्ण जगभर पसरला आहे. हा विषाणू श्वसनमार्गातून हवेच्या माध्यमातून पसरतो आणि सर्व वयोगटांतील लोकांना प्रभावित करू शकतो. विशेषतः हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक दिसतो.
चीनमध्ये HMPV च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या मिळाल्यानंतर केंद्र सरकार, आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद), आणि एनसीडीसी (राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र) यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) लवकरच यावर आपला अहवाल सादर करेल. नड्डा यांनी स्पष्ट केले की, भारतात सामान्य श्वसन विषाणूंच्या प्रकरणांमध्ये विशेष वाढ झालेली नाही.